Lok Sabha Election 2024 Voting LIVE Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 Voting LIVE: पैसे रस्त्यावर पडले, हेलिकॉप्टरमधून 'जड' बॅगा उतरवल्या! राऊत,पवार सत्ताधाऱ्यांवर संतापले!

Lok Sabha Election 2024 Voting LIVE updates in Marathi: "नगर दक्षिण मतदारसंघात आज 'राजा' असलेल्या प्रत्येकाच्या नावाने उत्तरेतून एक पाकीट आलं असून यात थोडा 'प्रसाद' आणि 'मालक'मंत्री यांचं फुलाला मतदान करण्याबाबतचं निवेदन आहे...

Mangesh Mahale

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात काल मध्यरात्री पैशाने भरलेली बॅग रस्त्यावर पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पारनेरचे भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांचे कार्यकर्ते भिडले. तर दुसरीकडे नाशिक येथील मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात 'जड' बॅगा उतरविण्यात आल्याचा आरोप होत आहे.

पारनेर तालुक्यात मध्यरात्री महायुती आणि आघाडीचे कार्यकर्ते भिडल्यामुळे परिसरात काही काळ तणाव होता. पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे ही घटना घडली. भाजपकडून हे पैसे मतदारांना वाटण्यासाठी आणले असल्याचा आरोप लंकेच्या कार्यकर्त्यांनी केला. पैशाने भरलेली बॅग रस्त्यावर पडल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी "नगर दक्षिण मतदारसंघात आज 'राजा' असलेल्या प्रत्येकाच्या नावाने उत्तरेतून एक पाकीट आलं असून यात थोडा 'प्रसाद' आणि 'मालक'मंत्री यांचं फुलाला मतदान करण्याबाबतचं निवेदन आहे,"असा आरोप सोशल मीडियावरुन केले आहे.

"अनेक गावांमध्ये स्वाभिमानी नागरिकांनी हा प्रसाद घ्यायलाच नकार दिला तर काही गावांत 'यंत्रणे'ने दिलेल्या प्रसादापैकी अर्धा प्रसाद गावातल्या वाढप्यानेच खाऊन टाकला...आता 'प्रसादात'ही आडवा हात मारला जात असेल तर आजचा 'राजा' कसा उदार होणार? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. काही महिलांनी आपल्या गाडीवर हल्ला केल्याचा आरोप राहुल शिंदे यांनी केला आहे. राहुल शिंदे, विजय औटी यांच्यावर पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शेअर केला आहे. मुख्यमंत्र्यांना घेऊन आलेल्या हेलिकॉप्टरमधून जड बॅगा उतरविण्यात येत असल्याचे यात दिसते, या बॅगेत मतदारांना वाटण्यासाठी पैसे आणल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.'मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण!'असे म्हणत राऊतांनी व्हिडिओ शेअर केला आहे.

दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहत आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचला निवडणूक आयोग फालतू नाकाबंदीआणि झडत्या करीत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे, असे आरोप राऊतांनी केला आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT