Mahavikas Aaghadi : राज्यसभेसाठी महाविकास आघाडीतून शरद पवार यांच्यापाठोपाठ काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांचे नाव समोर येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर देखील थोराताचं नाव गेल्यानं, महाविकास आघाडीबरोबरच काँग्रेसमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
याबाबत 'सरकारनामा'नं थोरातांशी संपर्क साधला असताना, 'अशी काय नावाची चर्चा आहे, हे माझ्यापर्यंत आलेलं नाही. मी मुंबईला चाललोय, तिथं जयंतराव पाटलांना भेटणार आहे, 'साखर' व्यवसायाशी संबंधित चर्चा होणार आहे. पण काय निर्णय होईल तो हायकमांड ठरवेल,' अशी सूचक प्रतिक्रिया दिली.
महाविकास आघाडीकडून शरद पवार (Sharad Pawar) यांचे राज्यसभेसाठी नाव जवळपास निश्चित आहे. शरद पवार यांच्याकडून निवडणूक लढवण्याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि नेते जयंतराव पाटील राज्यसभेच्या जागेसाठी मित्रपक्षांसाठी चर्चा करत आहेत. शरद पवार यांनी होकार दिल्यास, निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाकडून राज्यसभेवरून निवृत्त होत असलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांच्यासाठी पुन्हा आग्रही आहे. ठाकरे सेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे फिल्डिंग लावून आहेत. ही जागा शिवसेनेचीच आहे. त्यामुळे ती आम्हाला मिळावी, अशी आग्रही मागणी आदित्य ठाकरे यांची आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून (Congress) देखील आता बाळासाहेब थोरात यांचे नाव पुढे येऊ लागले आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी नुकताच मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तिथल्या चर्चेत थोरातांचे नाव काँग्रेसकडून पुढे करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. यामुळे थोरातांचे नाव चर्चेत आलं आहे.
वृद्धत्वामुळे आणि अजित पवार यांच्या निधनाचा धक्का बसल्याने शरद पवार निवडणुकीत बाहेर राहतील, असा राजकीय अंदाज काँग्रेस बांधत असून, ऐनवेळी आपला देखील राज्यसभेसाठी उमेदवार तयार असावा, यासाठी बाळासाहेब थोरात यांचे नाव पुढे केले जात असल्याची चर्चा आहे.
राज्यसभेसाठी काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांचे नाव समोर येताच, 'सरकारनामा'ने थेट त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावर ते म्हणाले, 'अशी काही चर्चा सुरू असल्याची माहिती तुमच्याकडूनच मिळाली. पण मी संगमनेरमध्येच आहे. लग्न तिथी जास्त असल्याने फिरतोय. पण आता मुंबईला चाललो आहे. तिथं जयंतराव पाटलांशी चर्चा होणार आहे. साखर व्यवसायाशी निगडीत अन् इतर राजकीय स्थितीवर ही भेट असेल.' परंतु राज्यसभेसाठी हायकमांड जो निर्णय घेईल, त्यानुसार कार्यवाही होईल, असे थोरातांनी स्पष्ट केले.
बाळासाहेब थोरात काँग्रेसमधील दिग्गज नेते आहेत. राष्ट्रीय काँग्रेसच्या कोअर कमिटीचे सदस्य असून, ते नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह महाराष्ट्रातील काँग्रेससह विरोधकांमध्ये सहजपणे वावरणारे नेते आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात बाळासाहेब थोरात महसूल मंत्री होते. तसेच काँग्रेसकडून महाविकास आघाडीत समन्वयक साधताना महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांच्याशी त्यांचा जवळचा राजकीय अन् स्नेहसंबंध जुळून आल आहेत. मुंबईतील मराठी मोर्चात थोरातांनी राज ठाकरेंबरोबर चालत होते.
शरद पवार देखील काँग्रेस मधील विश्वासू चेहरा म्हणून थोरातांकडे पाहतात. लोकसभा निवडणुकीत नीलेश लंके यांना निवडणूक आणण्याची जबाबदारी थोरातांनी यशस्वीपणे पार पाडली होती. त्यामुळे शरद पवारांनंतर थोरातांचे राजकीय गणित राज्यसभेसाठी जुळून येईल, अशी चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.