Shamibha Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Transgender Candidate: 'ग्रेस' यांच्यावर पीएच.डी. करणाऱ्या तृतीयपंथी निवडणुकीच्या रिंगणात; बड्या नेत्यांच्या मुलांना दिले चॅलेंज

Raver Assembly constituency: शमिभा यांनी अंजली पाटलांसाठी कोर्टात धाव घेतली. उच्च न्यायालयाने अंजली पाटील यांचा अर्ज वैध असल्याचा महत्वपूर्ण निकाल दिला. या खटल्याची चर्चा राज्यभर झाली.

Mangesh Mahale

Shamibha Patil: तृतीयपंथी घटकांना न्याय मिळावा, त्यांना त्यांचे हक्क मिळावे, यासाठी रावेर विधानसभा मतदारसंघातून तृतीयपंथी शमिभा पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शमिभा पाटील यांना ही संधी दिली आहे. खान्देशात शमिभा यांच्या उमेदवारीची चर्चा आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघात 'वंचित'कडून शमिभा पाटील, काँग्रेसकडून आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी तर, भाजपचे दिवंगत माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे रिंगणात आहेत.

राज्यात तृतीयपंथी घटकातून निवडणूक लढविणाऱ्या त्या एकमेव उमेदवार ठरल्या आहेत. वयाच्या 30 व्या वर्षी आपण तृतीयपंथी असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. काल (बुधवारी) छानणीत त्यांचा अर्ज वैध ठरला आहे. त्यांनी प्रचारास जोरदार सुरवात केली आहे. शमिभा पाटील (वय ३९) या उच्चशिक्षित असून त्यांनी मराठी विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. सध्या त्या कवी ग्रेस यांच्या साहित्यावर पीएच.डी करीत आहेत.

शमिभा पाटील या 2008 पासून त्या जळगाव जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्त्या म्हणून काम करीत आहेत.त्यांचे पूर्वीचे नाव श्याम मीना भानुदास पाटील असे होते. त्यानंतर त्यांनी शमिभा हे नाव धारण केले. ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी अंजली पाटील या तृतीयपंथींनी निवडणूक अर्ज महिला गटातून दाखल केला होता.

तत्कालीन निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या अर्ज बाद ठरवला होता. त्यानंतर शमिभा यांनी अंजली पाटलांसाठी कोर्टात धाव घेतली. उच्च न्यायालयाने अंजली पाटील यांचा अर्ज वैध असल्याचा महत्वपूर्ण निकाल दिला. या खटल्याची चर्चा राज्यभर झाली. अंजली पाटील निवडणुकीत विजयी झाल्या. त्यानंतर शमिभा या चर्चेत आल्या.

तृतीयपंथीयांच्या न्याय हक्कासाठी त्या सक्रिय आहेत. तृतीयपंथीय हक्क अधिकार समितीच्या त्या राज्य समन्वयक आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारणीच्या सदस्या आहेत.

रेशन अधिकार कृती समिती, केळी कामगार संघटना, आदिवासींचे वनहक्क, फैजपूरसह ग्रामीण भागातील झोपडपट्टीतील पुनर्वसन,गायरानधारकांचे अधिकार, बेघर हक्क निवारा यासाठी शमिभा पाटील यांनी लढा उभा केला आहे. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या प्रबुद्ध भारत या पाक्षिकाच्या लेखिका आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT