Nashik News, 10 Jul : पावसाळी अधिवेशनाचा शुक्रवारचा दिवस वेगळ्याच कारणाने चर्चेत आला. सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यातील राजकीय वादाचा नवीन अंक पाहायला मिळाला. त्यासाठी चक्क विधिमंडळाच्या पायऱ्यांचा वापर झाला.
नांदगाव विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ठार मारण्याच्या धमक्यांपर्यंत भुजबळ आणि कांदे यांच्यातील राजकारण पोहोचले होते. त्याचा दुसरा अंक शुक्रवारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर दिसला. या निमित्ताने थेट राज्य सरकारवरच गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यामुळे विरोधकांचे कामही महायुतीचे घटक पक्षच करीत असल्याचे दिसले.
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या रेशन धान्य वाहतुकीच्या निविदेचा वाद रंगला. चार हजार कोटींच्या या निविदांतील तरतुदी कंत्राटदाराच्या सोयीने बदलल्या. त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. त्यात माजी खासदार समीर भुजबळ यांचा सहभाग असल्याचा दावा आमदार सुहास कांदे यांनी केला.
संदर्भात आमदार कांदे यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून माध्यमांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कांदे आणि भुजबळ यांच्यातील राजकारण नवे नाही. त्यात दिखाऊपणा किती आणि राजकीय सोय म्हणून होणारे आरोप किती ह्याचा नाशिककरांना अनुभव आहे.
या आरोपांचा समीर भुजबळ यांनी तातडीने इन्कार केला. संबंधित निविदा राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने मंजूर झाल्या. राजकारणाचा भाग म्हणून आरोप होत असल्याचे सांगत कांदे यांच्या आंदोलनातील हवाच काढण्याचा प्रयत्न झाला. या खात्याचा कारभार ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे आहे.
मात्र कांदे यांनी आरोप समीर भुजबळ यांच्यावर केले. राज्य शासनाच्या मंत्र्याच्या विभागात इतरांचा हस्तक्षेप आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न त्यातून दिसतो. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार कांदे भुजबळ यांच्यावर नेहमीच आरोप करीत असतात. त्या आरोपांमध्ये मतदारसंघातील राजकारण असते. नांदगावचे हे राजकारण थेट विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नेण्याचा कांदे यांचा प्रयत्न यशस्वी.
आमदार कांदे यांच्या आरोपांनी त्यांचे टार्गेट भुजबळ आहे. मात्र कारभार छगन भुजबळ यांच्याकडे, आरोप समीर भुजबळ यांच्यावर आणि आरोपीच्या पिंजऱ्यात थेट देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले आहे. यात कुठे विरोधक दिसले नाही. महायुतीच्या शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातच ही खडाखडी झाली. त्यामुळे घटक पक्षच महायुतीच्या सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधकांची ही भूमिका पार पडते की काय? ही चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.