मालेगाव : त्रिपुरातील मुस्लीमांवरील कथित अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान शहरात झालेल्या दगडफेक, तोडफोड, खूनाचा प्रयत्न, दंगल व सरकारी कामात अडथळा व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व हिंसाचार प्रकरणी मंगळवारी नव्याने आठ जणांना अटक करण्यात आली. रझा अकादमीच्या मुख्य कार्यालयाची सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी तपासणी केली.
यासंदर्भात यु ट्यूबवरुन प्रक्षोभक चित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी अम्मार अन्सारी याला अटक करण्यात आली. मंगळवारी अटक केलेल्यांमध्ये सामाजिक कार्यकर्ते अतिक अहमद यांच्यासह आठ जणांचा समावेश आहे. हिंसाचार प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या ४१ झाली आहे. अटक केलेल्यांना २० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहरातील इस्लामपुरा भागातील रझा ॲकॅडमीच्या मुख्य कार्यालयावर मध्यरात्री छापा टाकून कार्यालयाची तपासणी केली. पोलिसांनी कार्यालयातील विविध दस्तऐवज व कागदपत्र जप्त केले आहे. यात काही आक्षेपार्ह व प्रक्षोभक आहे किंवा काय याची तपासणी सुरु असल्याचे अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी सांगितले. हिंसाचारप्रकरणी आज शहर पोलिसांनी सात, आयशानगर पोलिसांनी एक अशा आठ जणांना अटक केली. दरम्यान किल्ला पोलिसांनी यु ट्यूबवरील प्रक्षोभक व धार्मिक भावना भडकविणारी चित्रफीत प्रसारित केल्याच्या गुन्ह्यात अम्मार अन्सारी या तरुणाला अटक केली. हिंसाचार प्रकरणात संशयित असलेल्यांना अटक करण्यासाठी तसेच दगडफेक व तोडफोडीच्या चित्रफिती पाहून संशयितांची ओळख पटविण्यासाठी सहा पथक गठित करण्यात आले आहेत. चित्रफीतपाहून ओळख पटल्यानंतर साक्षीदारांमार्फत खात्री झाल्यानंतरच संशयितांना अटक करण्यात येत आहे. कोणत्याही निरपराध व्यक्तीला अटक करण्यात येणार नाही. शहरवासीयांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन श्री. खांडवी यांनी केले.
जनता दल शहराध्यक्षांचेनिवेदन
त्रिपुरा हिंसाराच्या निषेधार्थ शहरात पुकारण्यात आलेला बंद शांततेत पार पडला होता. काही समाजकंटक व एका गटाने दगडफेक करत हिंसाचार घडवून आणला. पोलिसांनी दोषींवर कारवाई करावी. मात्र बंदचे आयोजन धार्मिक व राजकीय नेत्यांना या प्रकरणात नाहक गोवण्याचा प्रयत्न करू नये, असे निवेदन जनता दलाच्या शहराध्यक्षा व मनपा विरोधी पक्षनेत्या शानेहिंद निहाल अहमद यांनी अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांना दिले. धार्मिक संघटना व राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल करणे अन्यायकारक आहे. हे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शिष्टमंडळात नगरसेवक अब्दुल बाकी, रिझवान खान, सोहेल अब्दुल करीम, सलीम गरबड, मोमीन अख्तर व नईम उर रहेमान यांचा समावेश होता.
दरम्यान पोलिसांनी शहरात अशांतता निर्माण करणारे व दंगलखोऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी जोमाने मोहीम राबविली आहे. या मोहिमेत पोलिसांना शहरवासीय फारसे सहकार्य करीत नाहीत. यामुळे पोलिस प्रत्येक पाऊल जपून व विचारपूर्वक टाकत आहेत. पोलिसांच्या कारवाईवरुन राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप करतानाच एकमेकांना लक्ष्य करण्याची संधीही सोडली नाही.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.