Manikrao Kokate News: बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मी पहिल्यांदाच एवढ्या सकाळी उठलो, असे विधान केले होते. त्यावर राज्यभरातून टीका झाली. विशेषतः माध्यमांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला होता.
याठिकाणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज शिर्डी येथील अधिवेशनाला जाताना आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी जे काही बोललो ते सर्वांनी ऐकले आहे. मात्र त्यावरून टीका टिप्पणी करणे योग्य नाही. माझ्या बोलण्याचा काही प्रमाणात विपर्यास झाल्याचेच चित्र आहे.
शेतकरी काही बाराही महिने भल्या पहाटे शेतीत जात नाही. शेतकरी सकाळी लवकर उठून शेतावर जरूर जातो. पण बारावी महिने तो काही सकाळी किंवा पहाटे शेतीवर जात नसतो. माझ्या बाबतीतही तसेच आहे, असे कृषी मंत्री म्हणाले.
गरज असेल तेव्हा मी कामासाठी रात्र किंवा दिवस असा भेद करत नाही. मनापासून काम करतो. कोणाच्याही मदतीला धावून जातो. माझ्या बोलण्यात आणि कृतीत कधीही फरक पडत नाही. मी जे बोलतो ते मी करतो. हे सबंध नाशिक जिल्ह्याला माहित आहे. आगामी काळात सबंध महाराष्ट्राला देखील अवगत होईल, असे कोकाटे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अधिवेशन आज शिर्डी येथे सुरू झाले. या दोन दिवसीय अधिवेशनासाठी कोकाटे सहभागी होण्यासाठी निघाले होते. यावेळी आपल्या मतदारसंघात ते पत्रकारांशी बोलले. यावेळी त्यांनी बारामती येथील कार्यक्रमातील विधानाची माहिती दिली.
कोकाटे म्हणाले, मी शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर सध्या काम करीत आहे. त्याविषयी काय करायचे याबाबत देखील मी सविस्तर मांडले. त्याची विविध स्तरावर दखल घेण्यात आली. अनेकांनी माझ्या भाषणाचे कौतुक केले आहे.
मात्र नेहमीप्रमाणे काही माध्यमांनी आणि समाज माध्यमांत 'मी उशिरा उठतो' या वाक्यावर नको तेवढा भर देण्यात आला. म्हणूनच उदाहरण म्हणून मी पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख केला. त्याला उपमुख्यमंत्री अजितदादांसह सगळ्यांनीच मनसोक्त हसून दाद दिली होती.
याचा संदर्भ एवढाच की, गरज असेल तेव्हा मी केव्हाही उठू शकतो आणि कामाला लागतो. हे महाराष्ट्राला अवगत करण्याची माझी भूमिका होती. आजही संपूर्ण महाराष्ट्र सकाळपासून दौऱ्याला सुरुवात केली आहे.
रात्री उशिरापर्यंत विविध ठिकाणी कार्यक्रम सुरू असतात. कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी उपस्थित असतात. मुक्काम असेल त्या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते मला भेटतात. त्या सर्वांचीच मने सांभाळावी लागतात. कारण माझ्या राजकीय जीवनाला याच कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर हातभार लावलेला आहे. अशावेळी मी वेळ आणि काळ पाहत नाही.
अनेक धार्मिक कार्यक्रमांना तर मी पहाटेच हजर असतो.परंतु त्याचे मार्केटिंग करण्याची मला गरज भासत नाही. राजकीय जीवनात एक ठराविक वर्ग नेहमी नकारात्मक असतो. अशा प्रकारच्या बातम्यांना प्रसिद्धी देतो. त्यातीलच हा एक प्रकार आहे, असे कोकाटे म्हणाले.
सध्या मी ज्या प्रामाणिकपणे काम करीत आहे त्यातून निश्चितच काहीतरी ठोस काम उभे राहील. शेतकऱ्यांसाठी चांगली कामे करण्याची माझी मनापासून इच्छा आहे. आगामी काळात निश्चितच सर्व शेतकरी त्यासाठी माझे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.