Manikrao Kokate vs Eknath Shinde: बिनधास्त बोलण्याचा लौकिक असलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा असेच विधान केले आहे. त्यांचे ताजे विधान शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदारांना कानपीचक्या तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे कौतुक म्हणावे लागेल.
राज्य शासनाने राज्यातील सुरक्षा देण्यात आलेल्या नेत्यांचा आढावा घेतला. सुरक्षा व्यवस्थाचा आढावा घेताना ज्यांना धोका नाही, तसेच पोलीस संरक्षणाची गरज नाही, अशांची यादी करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदारांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली. त्यामुळे या आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. यावरून महायुतीतील घटक पक्षांत अस्वस्थता निर्माण झाली.
यासंदर्भात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपली परखड भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, ज्यांनी आपल्याला निवडून दिले आहे. त्यांच्यापासून आपल्याला कसला धोका आहे. ज्यांनी निवडून दिले ते आपले शत्रू कसे होऊ शकतात? त्यामुळे सुरक्षित कपात करण्याच्या निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे.
लोकप्रतिनिधींनी जनतेची कामे करायची असतात. त्यामुळे त्यांनी जनतेतच राहिले पाहिजे. ज्यांच्यासाठी आपण कामे करतो त्यांच्यापासून कसला धोका होणार आहे. आपण लोकांमध्ये राहिले पाहिजे, असा चिमटा ही त्यांनी घेतला.
विशेष म्हणजे मंत्री कोकाटे कॅबिनेट मंत्री झाले आहेत. ते पहिल्यांदाच मंत्री झाले. त्यानंतर त्यांना देण्यात आलेली सुरक्षा आणि पोलिसांची वाहने त्यांनी स्वतःहून कमी केली. मला कोणतीही विशेष सुरक्षा नको, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. या पार्श्वभूमीवर त्यांचे विधान साजेसेच आहे.
मंत्रिमंडळ निर्णय आतील माहिती बाहेर जाता कामा नये. या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याशी त्यांनी सहमती व्यक्त केली. ते म्हणाले, मंत्र्यांचे गोपनीय विषय बाहेर जाता कामा नये. तशी पद्धतच आहे. अन्यथा अनेक अडचणी उद्भवू शकतात. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत योग्य भूमिका घेतली आहे.
एकंदरच मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे पक्षाच्या आमदारांच्या सुरक्षेत कपात केल्याचा निर्णय घेतला आहे. गृह विभागाकडून नियमित आढावा घेऊन असे निर्णय घेतले जातात. मात्र सध्याच्या निर्णयाला राजकीय संदर्भही असल्याने याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर कृषिमंत्री कोकाटे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया राजकीय दृष्ट्या बोलकी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.