Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP Crisis Impact : जेव्हा आमदार कोकाटे कंत्राटदारांसह ‘पीडब्ल्यूडी’मध्ये जातात!

Sampat Devgire

Manikrao Kokate News : राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट अजित पवार यांच्या समवेत सरकारमध्ये सहभागी झाला आहे. त्यांना कोणती खाती देणार यावरून वाद-विवाद असला तरी त्याचे पडसाद पहायला मिळू लागले आहेत. येथील आमदार माणिकराव कोकाटे दोन दिवसांपूर्वी काही कंत्राटदारांसह सार्वजनिक बांधकाम विभागातच पोहोचले. यावेळी त्यांनी एका दमात अनेक कामे सुचवल्याने अधिकारीही घामेघूम झाले. (Manikrao kokate reached to PWD office with his favourable contractors)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पाठींबा दिला आहे. त्यासाठी त्यांनी बहुसंख्य आमदारांप्रमाणेच आपल्या मतदारसंघाचा विकास हे कारण सांगितले आहे. यासंदर्भात मतदारसंघातील कामांसाठी कोकाटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात एक बैठक घेतल्याचे कळते.

राज्यातील राजकीय स्थित्यंतराच्या पार्श्वभूमीवर सिन्नरचे आमदार कोकाटे हे दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील विकासकामे मंजूर केलेल्या कंत्राटदारांसह विविध कंत्राटदारांनाही बरोबर नेले होते. संबंधीत विभागांचे कार्यकारी अभियंता तसेच अन्य अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांच्या दालनात त्यांनी प्रत्येक कंत्राटदाराला तुमच्या अडचणी, समस्या सांगा असे सुचवले. त्यानंतर या कंत्राटदारांनी आपल्या अडचणी, कामे, त्यांची स्थिती आदी अनेक कामे सांगितली. अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेतली. कंत्राटदार एक एक काम सांगत होते, आमदार कोकाटे त्यावर आपल्या सूचना करत होते. अधिकारी त्याची नोंद घेत होते. जवळपास दोन तास ही बैठक सुरू होती.

सिन्नर मतदारसंघात एक क्रिडा संकूल प्रस्तावीत आहे. त्याचे प्राकलन पंधरा ते सोळा कोटींचे असावे. आमदारांनी ते थेट १५० कोटींचे करावे. त्यादृष्टीने त्यात नव्या सुविधा, कामे जोडावीत असे सुचविले. त्यावर महिला कार्यकारी अधिकारी भीत भीत म्हणाल्या, साहेब त्याचे काही निकष असतात, निधी मंजुरीचे स्तर असतात...वगैरे वगैरे. आमदार त्यांना थांबवत म्हणाले, ‘अहो, राज्यात, केंद्रात आपलेच सरकार आहे. तुम्ही तो प्रकल्प ३५० कोटींपर्यंत जाऊ द्या. मी केंद्राकडून, खेलो इंडियाकडून निधी आणतो’

ही चर्चा व सुचना वाढत वाढत ही सर्व कामे थेट ५०० कोटींवर गेली. एका दमात, एका बैठकीत एव्हढी कामे झाल्याने त्याचे प्रस्ताव तरी कसे करायचे या चिंतेने अधिकारी देखील घामेघूम झाल्याचे दिसून आले.

बैठक संपल्यावर एका अभियंत्याने गमतीने ही माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाची सध्याची स्थिती दयनीय आहे. या विभागाकडे १४ हजार कोटींचा निधी रखडला आहे. प्रत्यक्ष ६०० कोटी मिळाले आहेत. कंत्राटदार केलेल्या कामांचे पैसे मिळावेत म्हणून आंदोलन करीत आहेत. अन् आमदार कामे सुचवीत आहेत, करावे तरी काय, असे उद्वेगाने त्याने सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT