Manoj Jarange Patil On CM Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Politics : वैर संपले, फडणवीस-जरांगे पहिल्यांदा एकाच व्यासपीठावर येणार, नेमकं काय कारण..?

Devendra Fadnavis Manoj Jarange Patil : महायुती सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात जीआर काढल्यानंतर जरांगे पाटील यांनी आता फडणवीस आणि आमच्यातील वैर संपले आहे असे म्हटले होते.

Ganesh Sonawane

Maharashtra politics : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसणार असल्याच्या चर्चांणा राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. येत्या 26 ऑक्टोबर रोजी मंगळवेढा येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला दोघेही उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगितले जात आहे.

भाजपचे पंढरपूर-मंगळवेढा आमदार समाधान अवताडे यांनी या भव्य सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम 26 ऑक्टोबर रोजी मंगळवेढा येथे दुपारी 1 वाजता होणार आहे. आमदार अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनाही कार्यक्रमासाठी अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला दोघांचीही उपस्थिती निश्चित मानली जात आहे.

पुतळा समितीचे सदस्य कौंडू भैरी यांनी देखील यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर योग्य तो न्याय देण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनीही या अनावरण सोहळ्यास उपस्थित राहण्यास मान्यता दिली आहे.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, साताराचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, कृषिमंत्री दत्तात्रये मामा भरणे यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदार तसेच सर्व पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे आमदार अवताडे यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलन दरम्यान नेहमीच मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केलं. त्यांच्यावर अनेकदा शिवराळ भाषेत टीका केली होती. मुंबई येथील आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात देखील जरांगे यांचा रोख हा पूर्णपणे फडणवीस यांच्यावर होता. परंतु महायुती सरकारने हैदराबाद गॅजेटनुसार मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढल्यानंतर फडणवीस आणि आमचे वैर संपले असे जरांगे म्हणाले होते. आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस हे एका व्यासपीठावर येणार असल्याने सर्वांचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT