Nagar: मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे आणि त्यांच्या आंदोलकांचा काल (रविवारी) नगरमध्ये दुसरा मुक्काम झाला. जरांगे यांच्या पदयात्रेचा हा तळ बाराबाभळी (ता. नगर) येथील जामिआ मोहम्मदिया मदरशाच्या मैदानात होता. जरांगे यांनी मदरशात रात्री मुक्काम केला. सकाळीच्या न्याहारीत एक ग्लास दूध घेत मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा पुढचा प्रवास सुरू केला.
'मी पुन्हा येणार', असे आश्वासन देत मनोज जरांगे मदरशाबाहेर पडले. यावेळी मदरशातील मुलांनी केलेली दूध आणि बाजरीची भाकरी त्यांनी शिदोरी म्हणून बांधून मागितली आणि बरोबर देखील घेतली. मनोज जरांगे मदरशातून बाहेर पडताच क्षणी मुले आणि विश्वस्तांना गहिवरून आले. हा भाविक क्षण काहींनी त्यांची आठवण म्हणून कॅमेऱ्यात टिपला.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी अंतिम लढाई छेडली आहे. मराठा समाजाला चलो मुंबईचा नारा दिला आहे. पदयात्रा काढत मनोज जरांगे आणि आंदोलक मुंबईकडे निघाले आहे. या आंदोलनाचा दुसरा मुक्काम नगरमध्ये झाला. जामिआय मोहम्मदिया मदरशा आणि त्याच्यासमोरील मैदानात आंदोलकांनी रात्री मुक्काम केला. मनोज जरांगे हे पाथर्डीमार्गे बाराबाभळी (ता. नगर) येथे मध्यरात्री दाखल झाले. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
व्यासपीठावर पोहचल्यावर मनोज जरांगे जोरदार भाषण केले. रात्री एक वाजेपर्यंत ते व्यासपीठावर होते. यावेळी त्यांच्या आरामाची सोय मदरशामध्ये करण्यात आली होती. मध्यरात्री दीड वाजता ते मदरशात आले. तिथे यांना मुस्लिम समाजाचा पवित्र धर्मग्रंथ कुराण देत सत्कार करण्यात आला. यानंतर त्यांनी डाळ-भात, असे साधे जेवण केले. दोन ते अडीच वाजेपर्यंत त्यांना कार्यकर्ते भेटण्यासाठी येत होते. काही अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ देखील त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्याशी उशिरापर्यंत चर्चा झाली.
मनोज जरांगे यांनी रात्री मदरशात पाच तास आराम केला. सकाळची आठ वाजता उठल्यानंतर दिनचर्या उकरली. न्याहारीत एक ग्लास दूध घेतले. तसेच फरसाण खाल्ले. यावेळी मदरशातील मुलांनी बनवलेली बाजरीची भाकर त्यांना न्याहारीत देण्यात आली होती. ही भाकर मी बांधून घेणार आहे. माझ्या लढाईला ही बळ देणारी भाकरी आहे. हिंदुस्थानमधील ऐक्याचे प्रतिक या भाकरीत आहेत, असे उद्गगार जरांगे यांनी काढले. मदरशातील मुलांनी लगेचच ही भाकर बांधून दिली. यावेळी मनोज जरांगे यांनी त्यांच्याकडून दूध देखील मागितले. दूध आणि बाजरीची भाकर शिदोरी म्हणून मदरशातून बांधून घेत मनाोज जरांगे यांनी पुढच्या यात्रेला सुरूवात केली.
मनोज जरांगे यांना मदरशामधील मुक्काम भावला. सकाळची न्याहारी उरकल्यानंतर त्यांनी मदरशातील मुलांशी संवाद साधला. मदरशामध्ये हिंदू मुले देखील शिक्षण घेत असल्याचे पाहून ते भारावले. 'मदरशातून मागून घेतलेली दूध-भाकर, आता तर वायाच जाणार नाही. लढाईला बळच देणारी ठरणार. आरक्षण घेऊनच येतो, असे सांगून आरक्षण मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील ऐक्य परिषद याच मदरशात आणि मैदानावर घेणार', असे मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितले. मदरशाकडून मराठा आंदोलकांच्या केलेल्या सेवेने भारावलो. हिंदू-मुस्लिम ऐक्याची ही इतिहास नोंद राहिल, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.