Shivsena Morcha at Jalgaon
Shivsena Morcha at Jalgaon  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

‘आले शंभर, गेले शंभर, उद्धव ठाकरे एक नंबर’

Sampat Devgire

धुळे : शिवसेनेच्या (Shivsena) बंडखोर आमदार, मंत्र्यांसह जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, (Abdull Sattar) जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, महानगरप्रमुख सतीश महाले हे गद्दार आहेत. त्यांना आम्ही असा धडा शिकवू की ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. या बंडखोरीमागे भाजपचा (BJP) हात असल्याचा आरोप करीत संतप्त शिवसैनिकांनी `दे दणका` मोर्चा काढून त्यांचा निषेध केला. (Shivsena followers agitation against rebel shivsena leaders)

स्वकीयांनीच गद्दारी करताना या बंडखोरीमागे, महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या शहर शाखेतर्फे सोमवारी शहरात मोर्चा काढला. त्यात जुने निष्ठावंत कार्यकर्तेही सहभागी झाले.

शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ती मनोहर चित्रमंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चातून व्यक्त झाली. यात महिला शिवसैनिकांची संख्याही लक्षणीय होती.

स्वस्थ बसणार नाही

मोर्चेकऱ्यांनी आमदार एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री सत्तार यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. बंडखोर आमदारांनी दगाबाजी करताना त्यांना रातोरात सुरत व गुवाहटी येथे पळून नेण्यामागे भाजपचा हात असल्याचे लपून राहिलेले नाही. बंडखोर आमदार कुठेही गेले, तरी राज्यातील शिवसैनिक पक्षप्रमुख ठाकरे यांच्यासोबत आहे. शिवसैनिक गद्दारांना धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे मोर्चेकरी सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री यांनी सांगितले.

यावेळी उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख मनोज मोरे, समन्वयक धीरज पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भदाणे, कैलास पाटील, डॉ. सुशील महाजन, माजी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, भूपेंद्र लहामगे, माजी महापौर भगवान करनकाळ, माजी महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी, प्रफुल्ल पाटील, चंद्रकांत गुरव, तालुकाप्रमुख नाना वाघ, विश्वनाथ सोनवणे, अरुण धुमाळ, नितीन पाटील, मनीष जोशी, महिला आघाडीच्या हेमा हेमाडे, अरुणा मोरे, जयश्री वानखेडे, गायत्री लगड, नगरसेविका जोत्स्ना पाटील आदी उपस्थित होते.

पिंजरा अन्‌ घोषणाबाजी...

मोर्चात बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ बॅनर झळकविण्यात आले. अग्रभागी पाळीव कुत्रा, तसेच पिंजऱ्यात कोंडलेला कुत्रा ठेवत, त्यावर ५० कोटींचा फलक लावला होता. ‘शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है’, ‘आले शंभर, गेले शंभर, उद्धव ठाकरे एक नंबर’, अशा घोषणांनी मोर्चेकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT