Maratha Reservation  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation: पहिल्याच दिवशी मराठा मागासलेपणाच्या सर्वेक्षणाला अडथळे

Pradeep Pendhare

Nagar: सर्वच राजकीय पक्ष लोकसभेच्या तयारीत असताना राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरून घमासान सुरू आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी अंतिम लढाईची हाक दिली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेते देखील राज्यभरात जनजागृती सभा घेत आहे. यातच राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणा तपासण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण सुरू झाले आहे. या सर्वेक्षणाला मात्र पहिल्याच दिवशी अडथळे आले. सर्व्हर डाऊन असल्याचा प्रमुख तांत्रिक अडथळा येत आहेत. या सर्वेक्षणासाठी शिक्षकांची नियुक्ती असल्याने शाळांच्या कामकाजावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

सर्वेक्षणासाठी प्रगणकांना प्रशिक्षण देणारे मास्टर ट्रेनर तसेच नोडल अधिकाऱ्यांकडून राज्य मागासवर्ग आयोग अॅप विकसीत करणारी गोखले इन्स्टिट्यूट यांच्याकडे संपर्क साधला होता. मात्र सायंकाळपर्यंत हे अडथळे येतच होते. सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकांना त्यांच्या मोबाईलवर अॅप डाऊनलोड करून त्यावर अॅप डाऊनलोड करून घेऊन लॅाग इन व्हायचे आहे. यानंतर सर्वेक्षणासाठी अर्ज समोर येऊन त्यावर प्रश्नावली येते. यावर माहिती भरायची आहे. प्रगणक म्हणून जिल्ह्यात ११ हजार ३०० जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्वेक्षणाचे प्रशिक्षण देताना या कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक अद्यायावत करण्यात आले होते. हे माबाईल क्रमांक गोखले इन्स्टिट्यूटकडे नोंदणी करण्यात आले आहेत. यानंतर अॅप डाऊनलोड होते. परंतु प्रगणक म्हणून नियुक्त केलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे कळवले गेलेले क्रमांक बदलले. काहींनी ज्या मोबाईलचे क्रमांक कळवले होते, अॅंड्राईड मोबाईल नसल्याचे समोर आले. यामुळे स्मार्ट मोबाईल क्रमांक अपडेट करण्यात येत आहेत. यात पुन्हा वेळ जाणार आहेत.

नगर शहरातील महापालिका हद्दीतील ८९७ पैकी दीडशेपेक्षा अधिक प्रगणकांबाबत हा प्रश्न निर्माण झाला होता. तर काही प्रगणकांचे लॅाग इन यशस्वी झाले, परंतु त्यांना सर्व्हरचा अडथळे आले. त्यामुळे प्रश्नावली आणि त्यावरील माहिती नोंदवण्याचे काम ठप्प होते. याशिवाय अॅपमधून एक्झिट होण्यात देखील अडथळे येत होते. त्यामुळे सर्व माहिती पुन्हा भरावी लागत होती. तसे वारंवार होते. त्यामुळे प्रगणकांना मनस्ताप होत होता आणि यात वेळ वाया जात होता.

एका प्रगणकास आठ दिवसांत म्हणजेच ३१ जानेवारीपर्यंत १०० कुटुंबांचे सर्वेक्षण करायचे आहे. त्यामुळे एका दिवसात किमान १२ ते १३ कुटुंबाचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. तांत्रिक अडथळ्यांमुळे त्यात अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत प्रगणक तक्रारी करत आहेत. यातच वेळ वाया जात असल्याने दिलेल्या मुदतीत काम होईल का हा देखील प्रश्न आहे. तसे जिल्हा प्रशासनासमोर आव्हान आहे. सर्वेक्षणाचा शालेय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात सकाळी साडेसात ते ११ वाजताच्या वेळेत शाळा भरण्याचे परिपत्रक महापालिकेच्या शिक्षण विभागाने काढले आहे. असे असले तरी शाळानिहाय शिक्षक समप्रमाणात नियुक्त करण्यात आलेले नाहीत. कमी-अधिक प्रमाणात शिक्षक नियुक्त असल्याने याचा परिणाम शालेय कामाकाजावर होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT