Road stop Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation : व्याप्ती वाढली; मराठा आंदोलकांनी मुंबई महामार्ग केला ठप्प!

Road stop on Mumbai-Agra highway : अचानक झालेल्या आंदोलनाने पोलिसांची धावपळ, महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा.

संपत देवगिरे : सरकारनामा

Nashik News : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे तीव्र पडसाद नाशिकमध्ये उमटले आहेत. आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे. आज आंदोलकांनी मुंबई - आग्रा महामार्ग ठप्प केला. मराठा समाजाला आरक्षण आणि आंदोलकांविरोधात दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या अनत्याग आंदोलनाची व्याप्ती वाढू लागली आहे.

नशिकमध्ये मनोज जरांगे यांना पाठिंबा म्हणून कालपासून विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत. आज सकाळी मुंबई - आग्रा महामार्गावर आडगाव येथे अचानक रास्ता रोको करण्यात आला. या रस्ता रोकोमुळे प्रदीर्घ काळ महामार्गावर वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पोलिसांचीदेखील धावपळ उडाली. या वेळी पोलिसांनी बाळाचा वापर करून आंदोलकांना दूर नेले. राज्य शासनाच्या निषेधार्थ आंदोलनाची व्याप्ती अधिक तीव्र करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली. पोलिस बाळाचा वापर करून मराठा आरक्षणाचे आंदोलन थांबवता येणार नाही. आमचा आवाज सरकार दाबू शकत नाही. सरकारने दिलेल्या शब्द पाळावा. मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्यात यावे, याबाबत मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाकडे उदासीनतेने पाहू नये. त्याचे गंभीर परिणाम राज्य सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना भोगावे लागतील, असा इशारा या वेळी आंदोलकांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आंदोलनाचे तीव्र पडसाद नाशिक जिल्ह्यात उमटत आहेत. काल यासंदर्भात ग्रामीण भागात विविध ठिकाणी बंद पाळण्यात आला होता. नाशिक शहरात भाजपचे आमदार राहुल ढिकले यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले होते. त्यांनी आंदोलकांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला. अधिवेशनात जिल्ह्यातील सर्व 15 आमदारांनी एकमताने आरक्षणाला पाठिंबा देण्याची भूमिका विधानसभेत घ्यावी, यासाठी सर्व आमदारांना पत्र देण्यात येणार आहेत. याबाबत आमदार ढिकलेदेखील पुढाकार घेतील, असे सांगण्यात आले.

राज्य शासनाने मनोज जरांगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाकडे गांभीर्याने पाहवे, अन्यथा राज्य सरकारविरोधात राज्यभर आंदोलने सुरू होतील. ही आंदोलने सरकारला झेपणार नाहीत, असा इशारा या वेळी सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. रास्ता रोको आंदोलनात नाना बच्छाव, करण गायकर, मनोरमा पाटील, मिथुन लभडे, सचिन पवार तसेच आडगाव ग्रामस्थ तसेच सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

(Edited by Amol Sutar)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT