sadabhau Khot  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Milk Price Protest : विखेंच्या 'खास मेसेज'मुळे खोतांचे खर्डा-भाकरी आंदोलन मागे; दुपारी बैठक

राजेंद्र त्रिमुखे

Ahemadnagar News : दूध दरवाढ आणि पशुधन सुरक्षाप्रश्नी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री सदाभाऊ खोत आज (१४ नोव्हेंबर ) राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या निवासस्थानासमोर शेतकऱ्यांच्या उपस्थितीत खर्डा -भाकरी खाऊन आंदोलन करणार होते. मात्र, राधाकृष्ण विखे यांनी काल रात्री सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा करून आंदोलन न करता नगरला चर्चेचे निमंत्रण दिले. विखेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत खोत आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

दुधाचे पडलेले दर, लम्पी आजारात शासनाची मदत आणि पशुधनाबाबतच्या उपाययोजना आदी विषय मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाकडे असल्याने सदाभाऊ खोत यांच्या आंदोलनाला आले होते. हे खर्डा-भाकरी खाऊन होणारे आंदोलन मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या लोणी येथील निवासस्थानासमोर होणार होते.

गाईच्या 3/5, 8/5साठी 45 रुपये दर मिळावा, पशुखाद्य दरावर सरकारचे नियंत्रण असावे, पशुखाद्य दर 50 टक्क्याने कमी करावेत, दूध भेसळ विरोधात धडक पथके तयार करावीत, जनावरांना विमा कवच योजना उपलब्ध करण्यात यावी, दूध दर मूल्य आयोग तयार करण्यात यावा व त्याला कायदेशीर मान्यता असावी, दूध दराला 'एफआरपी'चे कायदेशीर कवच मिळावे, प्रत्येक गावामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर व लॅब उपलब्ध करून मिळावी, दुष्काळसदृश भागात चारा डेपो उपलब्ध करून द्यावेत, अशा विविध मागण्या रयत क्रांती संघटनेच्या आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सदाभाऊ खोत आंदोलन करत आहेत.

पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री असल्याने राधाकृष्ण विखे यांच्या लोणी इथल्या निवासस्थानासमोर दुपारी आंदोलन करण्यात येणार होते. यासाठी शेतकऱ्यांना जवळच असलेल्या कोल्हार गावात सकाळपासूनच जमण्याचे आवाहन करण्यात आले होते. यानिमित्ताने खोत मोठे शक्तिप्रदर्शन करणार असल्याची माहिती होती. सदाभाऊ खोत हे फडणवीस सरकारमध्ये कृषिमंत्री राहिलेले आहेत. मात्र, शेतकरी, दूध, पशुधन आदी प्रश्नांवर त्यांनी विद्यमान महायुती सरकारविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केलेली असल्याने वसू बारसेच्या दिवशीच पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री विखेंच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणार असल्याने आंदोलनाला महत्त्व आले होते.

दरम्यान, या आंदोलनाची माहिती समजताच मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सदाभाऊ खोत यांच्याशी थेट संपर्क साधत त्यांना आंदोलन न करता चर्चेचे आमंत्रण दिले. याबाबत रयत क्रांती संघटनेचे राहुरी तालुकाध्यक्ष सतीश पवार यांनी 'सरकारनामा'शी बोलताना, चर्चेतून मार्ग निघत असेल तर आंदोलनाऐवजी नगर इथे जिल्हाधिकारी कार्यालयात विखे यांच्या बैठकीच्या आवाहनानुसार सदाभाऊ खोत उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली आहे.

दुपारी दोन वाजता नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार असून, तत्पूर्वी एक वाजता नगर जिल्ह्यासह राज्यातील रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने जमणार असल्याचे आणि आपल्या मागण्या मांडणार असल्याचे सतीश पवार यांनी सांगत लोणी इथे होणारे आंदोलन नगर इथे होईल, असेही सांगितले आहे. मात्र, चर्चेतून मार्ग निघत असेल तर नियोजित आंदोलनाऐवजी नगरमध्ये बैठकीला सदाभाऊ खोत उपस्थित राहणार असल्याची भूमिका पुढे आली आहे.

SCROLL FOR NEXT