Ahmednagar Political News : राज्य सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाप्रमाणे दुधाला भाव मिळावा, यासाठी पाथर्डीत मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दुग्धविकास मंत्र्यांच्या छायाचित्रांना दुग्धाभिषेक घालून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. राज्य सरकारने दुधाच्या भाववाढीसंदर्भात ठोस भूमिका घेण्याची मागणी केली. तसेच दुर्लक्ष केले तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दूध उत्पादकांनी दिला आहे.
दुधाच्या दरवाढीसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. शरद पवार यांनीही या प्रश्नी मुख्यमंत्र्यांना लक्ष घालण्याचे आवाहन केलेले आहे. यासाठी अकोले तालुक्यात सात दिवस अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यावर हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रालयात बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यानंतरही दुधाच्या दरावरून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत.
दुष्काळी परिस्थिती आणि मूळ उत्पादन दुधापेक्षा उपपदार्थांना जास्त दर या तफावतीकडे दूध उत्पादकांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे दूधदरवाढीबाबत राज्य सरकारने लवकरच निर्णय घेण्याची मागणीही केली. पाथर्डीतील दूध उत्पादकांनी दूधदरवाढीसाठी मंत्र्यांना दुग्धाभिषेक घालण्याचा इशारा दिला होता. यासाठी शुक्रवारी दूध उत्पादकांनी एकत्र येत आंदोलन केले.
पाथर्डी शहरातील नाईक चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे दुग्धविकास तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या छायाचित्रांना दुग्धाभिषेक करून आंदोलन करण्यात आले. आदिनाथ देवढे यांनी यांच्या नेतृत्वाखाली दिनाथ देवढे, प्रा. सुनील पाखरे, दत्ता पाठक, अक्षय वायकर यांच्यासह दूध उत्पादक आंदोलनात सहभागी झाले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आदिनाथ देवढे म्हणाले, "पाथर्डीत दुष्काळी स्थिती आहे. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी आणि दूध उत्पादक हैराण आहेत. यातच राज्य सरकारने दुष्काळी यादीत पाथर्डीचा समावेश केला नाही. परिणामी शेतकरी आणि दूध उत्पादकांवर अन्याय झाला आहे. राज्यकर्त्यांना निवडणुका सोडून जनतेच्या समस्या दिसत नाहीत. "
"निवडणुका आल्यावर जनतेची आठवण येते. दूध हा नाशवंत पदार्थ आहे. महागाईत दूध उत्पादन घेणे परवडत नाही. मूळ दूध उत्पादनापेक्षा उपपदार्थांचे भाव वाढले आहे, मग दुधाला का भाव मिळत नाही ?," असा प्रश्न या वेळी देवढे यांनी उपस्थित केला. दुधाच्या दरावर सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर पुढचे आंदोलन तीव्र असेल," असा इशाराही देवढेंनी दिला.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.