Ahmednagar News : समन्यायी पाणी वाटप कायद्यावरून भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला. मंत्री विखे यांनी थोरातांना या कायद्यावरून खलनायक म्हटलं आहे.
मंत्री विखे गेल्या काही दिवसांपासून थोरातांवर वारंवार निशाणा साधत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्री विखेंकडून घेरण्याचा प्रयत्न होत असतानाच, थोरात देखील तेवढ्यात संयमाने प्रत्युत्तर देत आहेत.
राहाता तालुक्यातील लोणी इथं पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. चेअरमन कैलास तांबे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी भाषणाच्या सुरवातीलाच समन्यायी पाणी वाटपाच्या मुद्यावरून आमदार बाळासाहेब थोरात यांना लक्ष केले.
मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, "निळवंडे धरणावरून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न शेजारच्या मित्रानं केला आहे. पण धरणातील पाणी काढण्याचं पुण्य विखे कुटुंबियांना मिळालं. स्वतःला जलनायक म्हणून घेणाऱ्यांनीच समन्यायी पाणी वाटपाचे भूत जिल्ह्याच्या मानगुटीवर बसवून खलनायकाची भूमिका बजावली." सात वर्षे महसूलमंत्री असून, जिल्ह्याच्या हितासाठी एकही निर्णय त्यांना घेता आला नाही. जिल्ह्याच्या हितासाठी मी केलेली 50 कामे दाखवतो, तुम्ही केलेले एक तरी काम दाखवा, असं आव्हान मंत्री विखे यांनी काँग्रेसचे (Congress) बाळासाहेब थोरातांना दिलं.
मंत्री राधाकृषण विखे गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री बाळासाहेब थोरातांवर वेगवेगळ्या माध्यमातून हल्ले चढवत आहेत. बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात देखील दौरे वाढवले आहे. मंत्री विखे यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे देखील संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यातूनच चाचपणीसाठी मंत्री विखेंकडून थोरातांवर राजकीय हल्ले वाढवल्याचं सांगितलं जात आहे. बाळासाहेब थोरात मात्र संयम राखून आहेत.
विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने गेल्या हंगामात ऊस उत्पादकांना एकरकमी तीन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव दिला होता. दिवाळी निमित्ताने आणखी 200 रुपेय प्रतिक्विंटल देणार असल्याची घोषणा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी या सभेत केली. दहा आॅक्टोबरपासून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहोत. प्रवरा सहकारी बँकेला 50 वर्षे आणि विखे कारखान्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने दोन्ही संस्थानच्या सभासदांना विशेष भेटवस्तू देणार असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जाहीर केलं.