MLA Farukh Shah at MSEDCL office
MLA Farukh Shah at MSEDCL office Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आमदार शाह यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत घाम फोडला!

Sampat Devgire

धुळे : शहरासह (Dhule) जिल्ह्यात पहिल्या दिवशी केवळ पाच मिनिट वादळी वारा आणि दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसावेळी ठिकठिकाणी अनेक तास वीजपुरवठा खंडित झाला. सतत वीजेचा लपंडाव सुरूच होता. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला. या स्थितीने वीज कंपनीचा गलथान कारभार ‘एक्स्पोज’ केला. (MLA Farukh Shah Exposed MSEDCL compony)

अशा प्रकारामुळे संतप्त आमदार फारुक शाह यांनी साक्री रोडवरील कंपनीच्या कार्यालयात सोमवारी दोन तास ठिय्या मांडत अधिकाऱ्यांना फैलावर घेत घाम फोडला.

शहरासह ठिकठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत ठिय्या सोडणार नाही, अशी ताठर भूमिका आमदार शाह यांनी घेतली. तसेच कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी लावून धरली. नागरिकाला विजेबाबत तक्रारी किंवा काही माहिती द्यायची असल्यास अधिकारी, कर्मचारी कुणाचेही फोन, मोबाईल घेत नाहीत, लँडलाईन फोनचा रिसिव्हर खुशाल बाजूला ठेऊन देतात याविषयी आमदार शाह यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

अधिकाऱ्यांनी सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करू, अशी हमी दिल्यावर आमदारांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांत वादळी वारा, नंतर पावसाच्या सलामीनंतर अनेक तास वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले. आमदार समर्थकांनी वीज कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वीज कंपनीचे ग्रामीणचे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे आणि भीमराव म्हस्के यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावून कारवाई करु, असे आश्‍वासन दिले.

शासनाने वीजेबाबत अपग्रेडेशन, पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी कोट्यवधींचा निधी दिलेला आहे. तरीही पावसाळ्यात पुरवठ्याचा प्रश्‍न निर्माण होत असेल तर कारभाराची शासनाला चौकशी करावी लागेल, असेही अधिकाऱ्यांना सुनावण्यात आले. पावसाळ्यातील उपाययोजनांबाबत संयुक्त चर्चा झाली.

अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार उपस्थित नसल्याने व त्यांचा मोबाईल बंद येत असल्याने आमदार शाह यांनी नाराजी व्यक्त केली. नगरसेवक सईद बेग, माजी नगरसेवक साबीर सय्यद, अमिर पठाण, नासीर पठाण, आसिम मुल्ला, आसिफ शाह, जुन्नेद पठाण, हकीम अन्सारी, रियाज शाह, रफिक पठाण, शाहरुख शेख आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT