Mangesh Chavan News: भाजपचे आमदार मंगेश चव्हाण (चाळीसगाव) विविध कारणांनी चर्चेत असतात. आता त्यांच्या अति उत्साहीपणामुळे ते पुन्हा एकदा अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. यावेळी स्व पक्षाच्याच नेत्यांनी त्यांची कोंडी केली.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांचे नाव घेतले जाते. विशेषता जळगावच्या राजकारणात भाजपचे नेते त्यांना संकट मोचक यांचे राईट हॅन्ड असे संबोधतात. गेले काही दिवस ही प्रतिमा जाणीवपूर्वक बिंबवली जात होती.
सध्या मात्र आमदार चव्हाण वेगळ्याच कारणाने अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. नाशिकच्या आमदारांनी त्यांना हा दणका दिला आहे. कुंभमेळ्याच्या बैठकीतील उपस्थिती आणि कामकाजात उत्साही पणाने केलेल्या सूचना त्यांना महागात पडतात की काय अशी स्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाने सेवा पंधरवडा उपक्रम जाहीर केला होता. नाशिक मधील कार्यक्रमांच्या समन्वयासाठी आमदार चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली होती. यानिमित्त त्यांनी जिल्ह्याच्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली.
या दरम्यान नाशिक महापालिकेत झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आढावा बैठकीतही आमदार चव्हाण सहभागी झाले. खरे तर या बैठकीला ते अपेक्षित नव्हते. मात्र अतिउत्साही आमदार चव्हाण हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला देखील सहभागी झाले.
महापालिकेत झालेल्या या बैठकीत आमदार चव्हाण यांनी महापालिका आयुक्तांस विविध अधिकाऱ्यांचे थेट संवाद देखील साधला. विविध सूचना केल्या. जास्त कुंभमेळ्याच्या कामकाजाबाबत आणि विकास कामांची चर्चा या बैठकीत झाल्याने आमदार चव्हाण यांची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली.
सिंहस्थ कुंभमेळाच्या निमित्ताने महापालिकेने सुमारे 15 हजार कोटींचा आराखडा करण्याची तयारी करीत आहे. या बैठकीला स्थानिक आमदारांना देखील टाळले जाते. त्यात आमदार चव्हाण मात्र उत्साहाने सहभागी होतात हे स्थानिक भाजपच्या आमदारांना खटकले.
त्यामुळे आता हे प्रकरण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचले आहे. आमदार चव्हाण हे स्वतःला भावी पालकमंत्री म्हणून प्रोजेक्ट करतात असे सूचक विधान एका आमदाराने यावेळी केले. आमदार चव्हाण यांची राजकीय कोंडी करण्याचा हा प्रयत्न होता हे लपून राहिलेले नाही.
आमदार चव्हाण आपल्या मतदारसंघात देखील आक्रमक विधाने आणि अधिकाऱ्यांवर आरोप करून सातत्याने चर्चेत असतात. त्यांचा उत्साही स्वभाव समर्थकांना भावतो. आता मात्र हाच स्वभाव त्यांना अडचणी तंतोकी काय अशी स्थिती आहे. किमान नाशिकच्या आमदारांनी तरी त्यांना एक दणका दिला आहे, हे नाकारता येत नाही. दरम्यान, याबाबत आमदार चव्हाणांना प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधण्यात आला मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.