Nilesh Lanke and Shivputra Sambhaji Mahanatya Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MLA Nilesh Lanke : आमदार नीलेश लंके, 'शिवपुत्र संभाजी' महानाट्य अन् चौकशीची चर्चा

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News :

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी नगरमध्ये आयोजित केलेला 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याला नगरकरांचा प्रचंड प्रतिसाद दिला आहे. रविवारी (3 मार्च) या महानाट्याच्या प्रयोगाला रेकॉर्ड ब्रेक लाखाची गर्दी झाल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला. यानिमित्ताने आमदार लंके 'तुसी छा गये', अशी चर्चा रंगलीय. हे महानाट्य नीलेश लंकेंसाठी लोकसभेचा दरवाजा तर खोलणार नाही ना, अशी चर्चा रंगली असतानाच, भाजपचे खासदार सुजय विखे यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी नगर शहरातील वाडिया पार्कवर घेतलेल्या अजय-अतुल यांच्या कॉन्सर्टचा संदर्भ दिला जात आहे.

पारनेरमधील नीलेश लंके प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या 'शिवपुत्र संभाजी' (Shivputra Sambhaji) या महानाट्याचा रविवारी तिसरा प्रयोग झाला. आज या महानाट्याचा शेवटचा प्रयोग होणार आहे. रविवारच्या प्रयोगाला तुफान गर्दी झाली होती. नगर-पुणे रस्त्यालगत दोन्ही बाजूने वाहनांची तीन-तीन किलोमीटरपर्यंत पार्किंग झाली होती. यातून वारंवार वाहतूक कोंडी होत होती. काहींनी जागा मिळाली नाही म्हणून मागे फिरले.

आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी लोकसभा निवडणुकीचा पत्ता खोलला नसला, तरी महायुतीतून उमेदवारीसाठी खासदार विखे यांच्यावर दबाव निर्माण करण्यात काहीसे यशस्वी झाल्याचे दिसत आहे. खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी लोकसभा 2019ची निवडणुकीपूर्वी अजय-अतुल यांची कॉन्सर्ट केली होती. त्याचपद्धतीने आमदार नीलेश लंके यांनी 'शिवपुत्र संभाजी' महानाट्य घेऊन लोकसभेची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. यात कितपत तथ्य आहे, हे येणारा काळच सांगेल.

दरम्यान, या महानाट्याला महायुतीसह महाविकास आघाडीतील नगर जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde), युवा नेते विवेक कोल्हे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, बाळासाहेब साळुंखे, घनश्याम शेलार, प्रा. मधुकर राळेभात, गहिनीनाथ शिरसाट, दीपक भोसले, करण ससाने, प्रिया कदम, छाया फिरोदिया, प्राचार्य पोपट तांबे, बाळासाहेब उगले, बंडू पाटील बोरुडे, रोहिदास कर्डिले, डॉ. सुदर्शन पोटे आदींनी हजेरी लावली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार नीलेश लंके यांच्या महानाट्य प्रयोगाच्या आयोजनाबाबत भाजप नेत्यांमध्ये मतभेद दिसले. भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी खोचक टिप्पणी केली, तर आमदार प्रा. राम शिंदे यांनी कौतुक करतानाच नीलेश लंके प्रतिष्ठानची चौकशी होईल, अशी भीती व्यक्त केली.

राधाकृष्ण विखेंची खोचक टीका

महानाट्य दोन किंवा जास्तीत जास्त तीन अंकी असते. त्यावर लवकर पडदा पडेल. महानाट्य फार काळ चालणार नाही. लोकसभेला कोण कोठे जाते, याची मला चिंता नाही. महायुतीला राज्यात यश मिळणारच आहे. त्यामुळे कोण कोणाच्या मानेवर जाऊन बसतो, याला फार मी महत्त्व देत नाही, अशी खोचक टिप्पणी मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी आमदार लंके यांच्यावर केली आहे. (Latest Marathi News)

भाजप आमदार राम शिंदे म्हणाले, 'टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये कमी चेंडूंत सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूप्रमाणे आमदार नीलेश लंके यांचा रनरेट सर्वाधिक आहे. सर्वाधिक लोकांच्या गळ्यातील ते ताईत बनलेले आमदार आहेत. त्यामुळे त्यांना भविष्याची कसलीही काळजी करण्याचे कारण नाही. आमदार लंके हे स्वतः लोकांना बसण्याची व्यवस्था करीत आहेत'. छत्रपती संभाजी महारांजाचा इतिहास इतक्या वर्षांनंतरही दैदिप्यमान आहे. लोकांना जे हवे आहे ते देण्याचे काम आमदार लंके यांनी केल्याचे आमदार शिंदे यांनी यावेळी म्हटले.

'नीलेश लंके प्रतिष्ठान'ची चौकशी?

शिवपुत्र संभाजी हे महानाट्य राज्याचा ऐतिहासिक ठेवा असून आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठीचा उपक्रम आहे. नीलेश लंके प्रतिष्ठानने यासाठी पुढाकार घेतला आहे. महानाट्याला प्रतिसाद पाहून अनेकांनी वेगळाच अर्थ काढला आहे. यातून नीलेश लंके प्रतिष्ठानची चौकशी लावण्याचा प्रयत्न केला. तशा काहीजणांनी जाणीवपूर्वक तक्रारी केल्या. परंतु संपूर्ण कारभार पारदर्शक असल्याने त्यात ते यशस्वी होऊ शकले नाही, असा दावा आमदार नीलेश लंके यांनी केला आहे. हे प्रयोग राजकीय हेतूने नाही तर सामाजिक हेतूने केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT