Nilesh Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar Lok Sabha : नीलेश लंके देणार सुजय विखेंना आव्हान : नगर लोकसभा लढविण्याचे संकेत

ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा शब्द माझ्यासाठी प्रमाण आहे.

सरकारनामा ब्यूरो

पारनेर : राजकारणातील माझ्या मर्यादा मी घालून ठेवल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा शब्द माझ्यासाठी प्रमाण आहे. त्यापलीकडे जायचे नाही, हीच माझ्या भविष्यातील राजकारणाची भूमिका असणार आहे. त्यांनी मला जर आदेश दिला तर कोणी कितीही मोठा असला तरी आपण त्याच्या विरोधात लढण्यास तयार आहोत, अशाच शब्दांत आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे एक प्रकारे अप्रत्यक्ष संकेत देत हा निर्णय शेवटी पक्षश्रेष्ठींचा आहे, असेही नमूद केले. (MLA Nilesh Lanke's indication of contesting the Nagar Lok Sabha)

नीलेश लंके प्रतिष्ठानचा सालाबाद प्रमाणे देहू (जि. पुणे) येथे कौटुंबिक स्नेह मेळावा पार पाडला. नीलेश लंके प्रतिष्ठानचा हा सहावा वर्धापन दिन होता. मेळाव्यास नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासह पारनेर मतदार संघातीलही हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. या वेळी झालेल्या मनोगतात सर्वांनी नगर दक्षिण लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लंके दांपत्यांपैकी एकाने निवडणूक लढवावी असा सूर आळवला. त्या वेळी लंके यांनी वरील उत्तर दिले.

लंके म्हणाले की, आमचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांनी आदेश दिला तर मी कोणतीही निवडणूक लढविण्यास तयार आहे. पण, लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीचा निर्णय हा शेवटी पक्षश्रेष्ठींचा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नीलेश लंके यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिल्याने नगर दक्षिणमधून डॉ सुजय विखे पाटील यांना ते कडवे आव्हान देऊ शकतात. त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत नीलेश लंके स्वतः उतरतात की त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या राणी लंके यांना उतरवतात, हे पाहावे लागणार आहे.

या वेळी ज्येष्ठ मार्गदर्शक ज्ञानदेव लंके, नीलेश लंके प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष सुदाम पवार, उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी, राजेंद्र चौधरी, सचिव ॲड. राहुल झावरे, दीपक लंके, नगराध्यक्ष विजय औटी, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, अशोक सावंत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू शिर्के , सचिव कारभारी पोटघन मेजर, श्रीकांत चौरे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, विक्रम कळमकर, महिला प्रमुख सुवर्णा धाडगे गंगाराम बेलकर, जयसिंग मापारी, संजय लाकुडझोडे, डॉ. बाळासाहेब कावरे, भूषण शेलार, सुभाष शिंदे, नितीन अडसूळ, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

सहा वर्षांपूवीचा संकल्प आणि आमदारकी

सहा वर्षांपूर्वी केवळ २८ विश्वासू सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये देहू येथे पहिला मेळावा झाला. त्याच वेळी नीलेश लंके प्रतिष्ठानची स्थापना झाली. तेथेच पारनेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा संकल्प करण्यात आला होता. तो संकल्पही शेवटास गेला आणि लंके विधानसभेचे आमदार झाले. त्याच प्रमाणे आजही लोकसभा लढविण्याचा जणू संकल्पच कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र, या बाबत आमदार लंके किंवा त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके लोकसभा निवडणूक लढविणार की नाही, हे याचे उत्तर काळच देणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT