Akshay Nikalje Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आमदार सुहास कांदे खोटारडे, छोटा राजनचा फोन हा स्टंट?

आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे.

Sampat Devgire

मुंबई : `छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या विरोधातील केस मागे घ्या, नाही तर परिणाम वाईट होतील` असा धमकीचा (Threatning Call to Suhas Kande) फोन आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांना केलाच नव्हता. हा त्यांनी केलेला पब्लिसिटी स्टंट (Publicity Stunt by Suhas Kande) आहे. भुजबळ यांच्याशी आमचा संबंध नाही. आमदार कांदे यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असे रिपब्लिकन पार्टीचे (RPI) मुंबई अध्यक्ष अक्षय निकाळजे (Akshay Nikalje) यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

आमदार सुहास कांदे यांनी मंगळवारी, छोटा राजन यांचा पुतण्या अक्षय निकाळजे यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधातील खटला मागे घ्या, अन्यथा परिणाम वाईट होतील असा दावा केला होता. त्यासंदर्भात आज श्री. निकाळजे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने असे कुभांड रचणे म्हणजे, राज्यातील उद्धव ठाकरे सरकारचे अपयश आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशीलाही आम्ही तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

यासंदर्भात श्री. निकाळजे म्हणाले, मी गेले चार- पाच वर्षे रिपब्लिकन पक्षाचे काम करतो आहे. राज्यात पक्षाचा विस्तार झाला आहे. युवकांमध्ये माझे चांगले स्थान आहे. आजवर माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. त्यामुळे अशा प्रकारे आमदार कांदे यांच्या आरोपाने माझी बदनामी झाली. त्याबाबत मी लवकरच श्री. कांदे यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करीन.

Chhagan Bhujbal- Suhas Kande

यासंदर्भात त्यांनी सविस्तर कथन केले. ते म्हणाले, दोन- तीन दिवसांपूर्वी आमचे काही नाशिकचे कार्यकर्ते पनवेल मार्गे मुंबईला येत होते. त्यांना टोल नाक्यावर तीस-चाळीस लोकांनी बेदम मारहाण केली. त्यातील एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. एक जण रुग्णालयात दाखल आहे. त्याची माहिती मिळाल्यावर मी श्री. कांदे यांना फोन केला. यावेळी श्री. कांदे यांनी तो टोलनाका माझा भाऊ चालवतो. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. माझ्यावर मोकाची कारवाई झालेली आहे. माझ्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे माझ्याशी सांभाळून बोला. अशी माहिती विचारण्यासाठी तुम्ही आमदाराला फोन करता का? पुन्हा फोन करू नका, अन्यथा तुमच्यावर गुन्हे दाखल होतील, असे आमदार कांदे यांनी सांगितले. मी त्यांना आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली आहे. ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. असे असताना आमच्यावर गुन्हे का दाखल होतील?, अशी विचारणा केली. या सर्व प्रकरणात मी छगन भुजबळ यांचे नावही घेतलेले नाही. मी कधीही त्यांना भेटलेलो नाही. ते एक मोठे नेेते आहेत. मात्र त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही. तरीही श्री. कांदे यांनी प्रसार माध्यमांतून आमच्यावर आरोप करून कुभांड रचले.

श्री. निकाळजे यांनी पुढे सांगितले की, त्या रात्री मला एक फोन आला. संबंधीत व्यक्ती मी एसीपी ऑफीसमधून बोलतो आहे. तुम्ही आमदार कांदे यांच्याशी फोनवर बोलले का? अशी विचारणा केली. मी त्यांना होकार दिला. त्यानंतर त्यांनी त्याचे काही रेकॅार्डींग आहे का विचारले. तेव्हा मी मला माहित नाही. मी चौकशी करतो, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एका खाजगी फोनवरून तीच विचारणा करण्यात आली. तेव्हा मला संशय आला. कारण एसीपी ऑफीसमधून खाजगी फोन कसा येऊ शकतो? त्यानंतर चौकशी केल्यावर मला श्री. कांदे यांच्या आरोपाविषयी कळले.

ते म्हणाले, श्री. कांदे जर आमदार आहेत, तर त्यांनी रचलेले कुभांड अतिशय हीन आहे. त्यांचा हा प्रकार राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या सरकारसाठी देखील चांगला नाही. त्याची चौकशी झाली पाहिजे. अगदी सीबीआय चौकशी व्हावी. कॅाल रेकॅार्डींग तपासले जावे. श्री. कांदे यांच्याशी संबंधीत टोल नाक्यावर कार्यकर्त्यांना मारहान करण्यात आली. त्यातील हा प्रकार आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT