Ahmednagar News: राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी नगरमधील एका मनसे सैनिकाला हेरत त्याला राज्य पातळीवर पक्षात काम करण्याची संधी दिली आहे. नगरमधील सुमित वर्मा यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या राज्य उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. या नियुक्तीबरोबरच सुमित वर्मा यांचा राज्य पातळीवर संघटनवाढीसाठी कस लागणार आहे.
अमित ठाकरे यांचा तीन महिन्यांपूर्वी नगर दौरा झाला होता. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी हा दौरा होता. या दौऱ्यानंतर देखील पक्षात पदनियुक्त्या रखडल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थी संघटनेमध्ये अस्वस्थता होती. शेवटी पदनियुक्तीला सर्वपित्री अमावास्याचा मुहूर्त लागला. यात नगरमधील एकनिष्ठ मनसे सैनिकाला हेरून सुमित वर्मा यांना राज्य पातळीवर जबाबदारी दिली आहे. सुमित वर्मा हे पक्ष स्थापनेपासून राज ठाकरे यांच्याबरोबर आहेत. मनविसेच्या माध्यमातून ते नगरमध्ये विद्यार्थी संघटनेत काम करत आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गांधी मैदानात नगरचे अंबिकानगर नामांतर व्हावे, अशी घोषणा केली होती. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अंबिकानगर नावासाठी सुमित वर्मा 'मनविसे'च्या माध्यमातून प्रयत्नशील होते.
यासाठी त्यांनी विविध आंदोलनं केली. ती लक्षवेधी ठरली. या आंदोलनापासून मनसेची फादर बाॅडी लांबच राहत होती. आता नगरचे नामांतर अहिल्यानगर करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मनसेने अंबिकानगर नावावर काहीशी माघार घेत अहिल्यानगर नावाला समर्थन दर्शविले आहे.
अमित ठाकरे नगर दौऱ्यावर असताना सुमित वर्मा हे त्यांच्याबरोबर सावलीसारखे उभे होते. नगरच्या सुमित वर्मा यांना राज्य पातळीवर 'मनविसे'त काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे. मनसेचे संघटन पाहिल्यास ते मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोजक्याच जिल्ह्यांमध्ये दिसते.
सुमित वर्मा यांना पक्षात काम करण्याची मोठी संधी असली, तरी राज्य पातळीवर संघटन करताना कस लागणार आहे, हे निश्चित आहे. हा नगरचा मनसे सैनिक राज ठाकरे आणि अमित ठाकरेंनी दिलेल्या संधीचे कसे सोने करतो, हे येणारा काळच सांगेल.
Edited by : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.