Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar On Parliament Session : मोदींनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले, मात्र खासदारांना कोणताही अजेंडा दिला नाही; शरद पवारांचा आरोप

कैलास शिंदे

Jalgaon News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. मात्र, या अधिवेशनाचा कोणताही अजेंडा आम्हा खासदारांना देण्यात आलेला नाही, त्यामुळे या अधिवेशनाबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. देशातील महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी हा विषय काढण्यात आला आहे, असे आपणास वाटते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केला. (Modi called a special session of Parliament, but gave MPs no agenda; Sharad Pawar)

जळगाव येथील जाहीर सभेपूर्वी पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर, सतीश पाटील आदी उपस्थित होते. त्यावेळी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ बाबत बोलताना शरद पवार यांनी केंद्र सरकारवर आरोप केला. राज्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे सरकारने तातडीने उपाययोजना करावी, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात ओबीसी मराठा असा वाद कोणी निर्माण करीत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. ओबीसी समाजाला आपल्यावर अन्याय झाला, असे वाटू नये, यासाठी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढवून मराठा आरक्षण द्यावे, असा सल्लाही पवार यांनी सरकारला दिला.

ते म्हणाले की, जालना येथे लाठीहल्ला केल्याबाबत सत्ताधारी विरोधकांना प्रश्न विचारीत आहेत. मात्र, त्यांच्याकडे सर्व यंत्रणा आहे, त्यांनीच त्याची चौकशी करावी. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे; परंतु ओबीसी समाजाला आपल्यावर अन्याय झाला, असे वाटून मतभेद निर्माण होऊ नये यासाठी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक १५ टकक्यांपर्यंत वाढवावी. संसदेत ते मंजूर करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे.

जालना येथे झालेल्या लाठीहल्याची जबाबदारी घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याच्या मुद्यावर ते म्हणाले की, गोवारी समाजाच्या चेंगराचेंगरीनंतर मधुकर पिचड यांनी राजीनामा दिला होता. मुंबई बॉम्बसफोटानंतर जबाबदरी घेऊन तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राजीनामा दिला होता. हीच प्रेरणा घेऊन राज्यातील मंत्र्यांनी आता राजीनामा द्यावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT