<div class="paragraphs"><p>Prataprao Pawar with Award winner corporators on Nashik</p></div>

Prataprao Pawar with Award winner corporators on Nashik

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

सर्व गोष्टी पैशाने नव्हे तर समाज उभा राहिल्यावर काम उभे राहते!

Sampat Devgire

नाशिक : शहराचा विकास सामाजिक जाणिवेवर अवलंबून असतो. लोकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याची जबाबदारी मुख्यत्वे नगरसेवकांची आहे. सामाजिक जाणिवेला लोकसहभागाची (Peoples Contribution) जोड मिळाल्यास अपेक्षित विकास शक्य आहे, ‘सकाळ’ माध्यम समूहाचे अध्यक्ष (Chairmen of Sakal media group) व ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार (Prataprao Pawar) यांनी केले.

ते म्हणाले, भौगोलिक स्थिती, हवामानाचा विचार करता पुणे शहराइतकीच विकासाची क्षमता नाशिकमध्ये असल्याने लोकसहभाग वाढविण्याची गरज आहे. भविष्याचा विचार करताना नाशिकमध्ये सॉफ्टवेअर पार्कसाठी पोषक वातावरण आहे.

नाशिक सिटिझन फोरमतर्फे कार्यक्षम नगरसेवक पुरस्काराचे वितरण सोमवारी श्री. पवार व विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते झाले. या वेळी श्री. पवार बोलत होते. ते म्हणाले, की पुणे व नाशिकची तुलना करताना पुणे पुढे व आपण मागे का, असा प्रश्‍न कायम चर्चेला येतो. पुणे शहराचा विचार करता सामाजिक जाणीव मोठ्या प्रमाणात आहे. ६५ टक्के शैक्षणिक संस्था महिलांनी सुरू केल्या, त्या यशस्वीपणे सुरू असल्याचे उदाहरण त्यांनी दिले. समाजाने ठरविले तर अशक्य ते शक्य करता येते. त्यासाठी वेळ दिला पाहिजे. सर्व गोष्टी पैशाने होतात हा विचार चुकीचा आहे. समाज उभा राहिल्यास कार्य उभे राहते. नगरसेवक व अधिकारी एकत्र कार्य करू शकत नाहीत. त्याला समाजाचे सहकार्य लागतेच. या सहकार्यातून अवघड गोष्टी सोप्या होतात. झोपडपट्टीतील व्यक्तीलादेखील समाजकार्यात सहभागी होण्याची इच्छा असते. त्याला सहभागी करून घेतले पाहिजे. लोकांसाठी विकासकामे करत असताना त्यांना विश्‍वासात घेण्याची आवश्‍यकता आहे. कामांमध्ये पारदर्शकता व सातत्य नगरसेवकांनी ठेवावे. समस्येवर मात करण्यासाठी टीका न करता पर्याय शोधून काढला पाहिजे. ज्यांना शहरात काही करण्याची इच्छा आहे त्यांना एकत्र आणले पाहिजे. ‘सकाळ’च्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी मदतीचे आश्‍वासन श्री. पवार यांनी दिले.

फोरमचे अध्यक्ष हेमंत राठी म्हणाले, की शहर विकासात महापालिकेची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे पुरस्काराच्या माध्यमातून इतर नगरसेवकांना हुरूप येण्याबरोबरच घरच्या लोकांकडून शाबासकीची थाप देण्यासाठी पुरस्कारांचा प्रपंच आहे. नाशिक सिटिझन फोरमचे सचिव अविनाश पाटील यांनी प्रास्ताविक, प्रशांत साठे यांनी सूत्रसंचालन केले. फोरमचे कार्यकारी सदस्य संदीप सोनार यांनी आभार मानले.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचा अध्यक्ष असताना पुणे शहरात काय असावे, याचा अभ्यास केला. त्यात तज्ज्ञांना सहभागी केले. त्यातून सॉफ्टवेअरची कमतरता जाणवली. त्या अनुषंगाने तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे चेंबरच्या माध्यमातून सॉफ्टवेअर पार्कसाठी मागणी केली. सातशे एकर जागेची मागणी मान्य झाल्यानंतर पुण्यात सॉफ्टवेअर कंपन्यांचे जाळे विस्तारले. पुणे व नाशिकमध्ये फारसा फरक नाही. चांगले वातावरण आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर पार्कसाठी नाशिकमध्ये पोषक वातावरण असल्याने दहा वर्षांत उत्तम शहर होऊ शकते, असे श्री. पवार यांनी नमूद केले. या वेळी फोरमचे उपाध्यक्ष आशिष कटारिया, माजी अध्यक्ष जितूभाई ठक्कर, सुनील भायभंग, डॉ. नारायण विंचूरकर, कार्यकारिणी सदस्य विक्रम कपाडिया, नरेंद्र बिरार, सचिन गुळवे आदी उपस्थित होते. पुरस्कार समितीचे सदस्य अभिजित कुलकर्णी, संजय पाठक व डॉ. अतुल वडगावकर यांचा सत्कार करण्यात आला.

सन्मानित मान्यवर

कार्यक्षम नगरसेवक पुरस्काराने स्थायी समितीचे सभापती गणेश गिते, नगरसेवक सुधाकर बडगुजर, सुषमा पगारे या तिघांना सन्मानित करण्यात आले. कोरोनाकाळात विशेष कार्य करणाऱ्या नगरसेवकांचा विशेष सन्मान करण्यात आला. पंचवटी विभागातून जगदीश पाटील, पश्‍चिम विभागातून स्वाती भामरे, सातपूर विभागातून वर्षा भालेराव, पूर्व विभागातून समिना मेमन, सिडकोतून छाया देवांग, तर नाशिक रोड विभागातून जगदीश पवार हे सन्मानित झाले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT