Heena Gavit  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha Constituency: डॉ. हिना गावित यांच्यासाठी घराणेशाहीचा मुद्दा ठरणार अडचणीचा...!

Nandurbar Political News : खासदार गावित यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांना चार वेळा संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Sampat Devgire

Lok Sabha Election 2024 : डॉ. हिना गावित सोळाव्या लोकसभेतील सर्वात तरुण खासदार होत्या. सलग नऊ वेळा खासदार राहिलेल्या माणिकराव गावित यांचा पराभव करून नंदुरबार या आदिवासी राखीव आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात डॉ. हिना गावित यांनी 2014 मध्ये भाजपचे खाते उघडले. त्यावेळी त्यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. गेल्या दोन निवडणुका त्यांनी भाजप-शिवसेना युतीकडून लढवल्या. सध्या त्या संसदेच्या महिला सशक्तीकरण समितीच्या सदस्य आहेत. यंदा त्या महायुती अर्थात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासह निवडणुकीला सामोऱ्या जाणार आहेत. त्यात शिवसेनेचे (शिंदे गट) चंद्रकांत रघुवंशी आणि आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची विळ्या-भापळ्याची मोट बांधण्यात त्यांचे कसब पणाला लागणार आहे.

नंदुरबारची जागा विद्यमान खासदार म्हणून भाजपला मिळेल, त्यात काहीही बदल होण्याची शक्यता नाही. मात्र यंदा महायुतीच्या नेत्यांमधील बेबनावामुळे डॉ. हिना गावित यांची उमेदवारी बदलावी यासाठी डॉ. विजयकुमार गावित यांचे विरोधक एकत्र आले आहेत. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवार बदलण्यासाठी दबाव टाकला आहे. याबाबत संयुक्त पत्र देखील भाजपश्रेष्ठींना देण्यात आले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून हॅटट्रिकच्या तयारीत असलेल्या डॉ. हिना गावित यांना उमेदवारी मिळेल का? याबाबत विविध कयास बांधले जात आहेत. अर्थात, आदिवासी विकास मंत्र्यांचे या जिल्ह्यातील बहुतांश सत्तास्थानांवर असलेले वर्चस्व आणि खासदार म्हणून डॉ. गावित यांनी दिल्लीतील लॉबीमध्ये निर्माण केलेले स्थान पाहता त्यांच्या विरोधकांचे भाजपमध्ये किती ऐकले जाणार याबाबत साशंकता आहे.

खासदार डॉ. गावित भाजपच्या उमेदवार म्हणून 2014 आणि 2019 अशा सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये विजयी झाल्या आहेत. त्यांचे वडील डॉ. गावित यांचा राज्यातील प्रमुख आदिवासी नेत्यांत समावेश आहे. खासदार गावित यांनी 2012 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांना चार वेळा संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. वडील मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्षासह विविध पदे घरातच असल्याने विविध विकासकामांच्या माध्यमांतून त्यांनी सरपंच ते सर्वच सत्तास्थांनावरील नेत्यांशी संपर्क वाढवला आहे. त्याचा लाभ गावित कुटुबियांना निवडणुकीत होत आला आहे.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील अक्कलकुवा, शहादा, नंदूरबार, नवापूर, साक्री आणि शिरपूर हे सर्व सहा विधानसभा मतदारसंघ आदिवासी राखीव आहेत. या सर्व सहा मतदारसंघांत सध्या भाजपचे आमदार आहेत, ही गावित यांच्यासाठी जमेची बाजू आहे. नंदूरबारला त्यांचे वडिल डॉ. विजयकुमार गावित हेच आमदार आहेत. अर्थात सर्व सत्तास्थाने भाजपकडे असली, तरीही काँग्रेस पक्ष आदिवासी मतदारांत आपले स्थान टिकवून आहे. गेल्या दोन निवडणुकांत येथे मोदी लाट असतानाही काँग्रेस आणि भाजपच्या मतांत सात टक्क्यांचा फरक राहिला आहे. काँग्रेसला यंदा शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाची मदत होणार आहे. त्यामुळे डॉ. हिना गावित यांना आगामी निवडणूक अगदीच एकतर्फी नसणार, हे मात्र नक्की. यासंदर्भात अंतर्गत सर्व्हेमध्ये भाजपसाठी हा मतदारसंघ रेड झोनमध्ये समाविष्ट असल्याने भाजपने येथे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

नाव (Name)

डॉ. हिना विजयकुमार गावित

जन्म तारीख (Birth Date)

28 जून 1987

शिक्षण (education)

एमबीबीएस, एम.डी. (मेडीसीन), एलएलबी.

कौटुंबिक पार्श्वभूमी (family background)

खासदार डॉ. हिना गावित या राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत. त्यांच्या आई कुमुदिनी या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य आहेत. बहीण डॉ. सुप्रिया जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांच्या दोन चुलत भगिनी जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. काका आणि काकू पंचयात समितीच्या सदस्य आहेत. त्यांचे एक काका यापूर्वी आमदार होते.

नोकरी/ व्यवसाय (Service/Business)

वैद्यकीय व्यवसाय आणि राजकारण

लोकसभा मतदारसंघ (lok sabha constituency)

नंदुरबार

राजकीय पक्ष (Political Party Affiliation)

भारतीय जनता पक्ष

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey): डॉ. हिना गावित यांनी २०१४ मध्ये थेट लोकसभेची निवडणूक लढविली आणि त्या खासदार झाल्या. 2019 मध्ये त्या दुसऱ्यांदा खासदार झाल्या. त्यापूर्वी त्यांनी कोणतीही निवडणूक लढविलेली नव्हती.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

डॉ. हिना गावित खेळाडू देखील आहेत. त्यांनी शालेय स्तरावर मैदानी खेळ, कॅरम आणि बुद्धीबळ यामध्ये विभागीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेतला आहे. स्वतः डॉक्टर असल्याने त्यांनी कान, नाक, घसा तपासणी शिबिरे घेतली आहे. रक्तदाब आणि मधुमेह तपासणीसाठी विविध उपक्रम राबवले. नेत्ररोग तपासणी शिबिरांचे आयोजन त्यांनी केले. महिलांसाठी आरोग्य शिबिरे घेतली. गरजू रुग्णांना त्यांनी मदत केली आहे. आदिवासी भागात रोगनिदान शिबिरांचे आयोजन केले.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

डॉ. हिना गावित यांनी भाजपच्या तिकिटावर 2019 ची लोकसभेची निवडणूक लढवली. डॉ. गावित यांनी काँग्रेस नेते माणिकराव गावित आणि के. सी. पाडवी जाधव यांचा दणदणीत पराभव केला. ही निवडणूक चुरशीची होती, मात्र मोदी लाटेत त्यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला.

२०१९ मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

डॉ. हिना गावित या २०१९ च्या निवडणुकीत भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार होत्या. त्यांनी ही निवडणूक एक लाख मताधिक्क्याने जिंकली. डॉ. विजयकुमार गावित यांचा मतदारसंघावर असलेला प्रभाव आणि भाजपची प्रचारयंत्रणा त्याला कारणीभूत होती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा उमेदवार ऐनवेळी ठरला होता. त्यातील एक गट तटस्थ राहिला. मतदारसंघातील काही प्रमुख काँग्रेस नेत्यांनी 2014 नंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर हिना गावित यांनी विद्यमान खासदार म्हणून केलेली विकासकामे आणि राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार असल्याने त्याचा मतदारसंघाच्या विकासासाठी होणारा लाभ या मुद्द्यावर त्यांचा प्रचार केंद्रित होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

आदिवासी तसेच शहरी भागातील नागरिकांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. हा जनसंपर्क वाढविण्यासाठी व्यक्तीगत लाभाच्या अनेक योजना त्यांनी मंजूर केल्या आहेत. आगामी काळात 90 हजार घरांमध्ये उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. व्यक्तीगत लाभार्थींना त्याचा लाभ मिळाल्याने मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क वाढला आहे.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

डॉ. गावित यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही शिक्षित वर्गाला जोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याद्वारे जनसंपर्क वाढवण्यावर त्यांनी भर दिला. भाजपची ध्येयधोरणे, आपल्या जनसंपर्क दौऱ्यांची माहिती, विकासकामे याची प्रसिद्धी त्या आपल्या सोशल मीडिया हँडलवरून करतात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

धुळे येथे मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना खासदार गावित त्या भागात होत्या. त्यावेळी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. गाडीवर हल्ला झाल्याचे सांगत त्यांनी मराठा आंदोलकांविरोधात आक्रमक भूमिका घेत अॅट्रॉसिटी दाखल करण्याचा मुद्दा लावून धरला होता. त्यांनी एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर शासनाचे बंधपत्र पूर्ण केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर दंडाची कारवाई झाली. त्याचा जेजे रुग्णालयाचे डीन आणि खासदार गावित यांचा वाद चर्चेत होता. कोरोनाच्या कालावधीत खासदार गावित यांनी ठाकरे सरकारवर गंभीर टीका केली होती. नंदुरबार मतदारसंघातील पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या. त्यावरून दिशा समितीच्या बैठकीत वाद झाला होता. त्यावर खासदार गावित यांनी स्वतःच सीबीआय चौकशीची मागणी केली होती. केंद्रीय निधीतील आमदारांच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन खासदारांनी परस्पर व विश्वासात न घेताच केले. त्यामुळे आमदार राजेश पाडवी आणि खासदार गावित यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले होते.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

वडील, राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित.

सकारात्मक मुद्दे (Positive points about Candidate)

गेल्या दोन टर्मपासून नंदुरबार मतदारसंघावर डॉ. हिना गावित यांचे वर्चस्व आहे. जिल्ह्यातील बहुतांश सत्तेची पदे त्यांच्याच घरात आहेत. त्यांचे वडील आदिवासी विकास मंत्री असल्याने सत्तेसोबत राहणारा गट त्यांना अनुकूल असतो. त्याचा लाभ त्यांना आजवर प्रत्येक निवडणुकीत होत आला आहे. मतदारसंघात त्यांनी मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक लाभाच्या योजना राबवल्या आहेत.त्यांची मतदारसंघावर चांगली पकड आहे. प्रत्येकाच्या सुख-दुःखात मदतीला धावून जाणे, तन-मन-धनाने मदत करणे या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. भाजपची स्वतंत्र यंत्रणा आदिवासी भागात कार्यरत असून लोकसभा निवडणुकीसाठी बूथप्रमुख ते सुपर युवा वॉरीअर्स अशी सहा स्तरांची भाजपची निवडणूक यंत्रणा आहे.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये नंदुरबार मतदारसंघ डेंजर झोनमध्ये असल्याचे बोलले जाते. नंदूरबार पालिकेच्या राजकारणात डॉ. विजयकुमार गावित विरूद्ध शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यात संघर्ष आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांतील दुरावा एक अडथळा आहे. या मतदारसंघातील धडगाव-अक्कलकुवा, शहादा-तळोदा, नवापूर-नंदुरबार आणि तळोदा असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात भाजप व काँग्रेसचे प्रत्येकी दोन आमदार असल्याने दोन्ही आघाड्या प्रबळ आहेत. त्यात महायुतीच्या नेत्यांकडून काँग्रेस आघाडीला पडद्यामागून बळ मिळू शकते. धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील गंभीर आहे. धनगर आरक्षणाविषयी भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. आदिवासी समाजाने काढलेल्या मोर्चापासून गावित हे दूर राहिले होते. डॉ. हिना गावित यांचा दिल्लीतील नेत्यांशी संपर्क असला तरीही वनजमिनीचे पट्टे तसेच मतदारसंघातील दुर्गम भागातील यंत्रणा विरोधकांकडे प्रबळ आहे.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

डॉ. हिना गावित या भाजपकडून दोन टर्म खासदार असल्याने पुन्हा उमेदवारी मिळेल असे संकेत आहेत. मात्र त्यांच्या उमेदवारीला भाजपच्याच नेत्यांनी विरोध केला आहे. घराणेशाहीला विरोध होत आहे. मात्र त्यांच्याच कुटुंबातील अन्य सदस्याला उमेदवारी देऊन त्यात तोडगा काढला जाऊ शकतो. काँग्रेसकडून येथून के. सी. पाडवी हे प्रमुख इच्छुक उमेदवार आहेत. येथे डॉ. गावित यांच्या विरोधात स्वपक्षीय आणि विरोधक एकत्र आले आहेत. डॉ. विजयकुमार गावित यांचे परंपरागत विरोधक माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा त्यात समावेश आहे. असे असले तरी गेल्या अनेक वर्षांच्या राजकारणाच्या जोरावर गावित यांनी स्वतःची ‘व्होटबॅंक’ तयार केली आहे. त्यांना उमेदवारी नाकारल्यास महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT