Nilesh Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke : नीलेश लंकेंचं नेमकं चाललंय काय? अधिकार नाही म्हणायचं अन् दुसरीकडं तगडं नियोजन करायचं

Nilesh Lanke held a booth center chief meeting in Parner-Nagar Assembly Constituency : विधानसभा निवडणुकीत पारनेर-नगर मतदार संघातील महाविकास आघाडीचा उमेदवार राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी होईल, असा विश्‍वास खासदार नीलेश लंके यांनी व्यक्त केला.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार असल्याचे सांगत खासदार नीलेश लंके यांनी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार देण्याचा माझा अधिकार नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात उमेदवार देतील.

महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी त्याचे काम करेल, असे सांगत असतानाच पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात नीलेश लंके यांनी बूथ केंद्रप्रमुखांची बैठक घेत जोरदार फिल्डिंग लावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (NCP) पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील बूथ केंद्रप्रमुख आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचे आभार मानत परिश्रमाने मोठ्या शक्तीला आपण पराभूत करू शकलो. काही लोक आपणास तुमचे काम आहे का? असे म्हणून हिणवत होते. मात्र सामूहिक जबाबदारीमुळे हिनवणाऱ्यांना मतपेटीतून आपण उत्तर दिले, असे खासदार नीलेश लंके यांनी म्हटले.

पारनेर तालुक्यातून आपल्याला 39 हजारांचे मताधिक्य मिळाले. असेच प्रामाणिकपणे विधानसभा निवडणुकीला काम करत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचा आहे. 'मविआ'चा उमेदवार एक लाखांच्या मताधिक्क्याने विजयी झाला पाहिजे, अशी आता तयारी करायची, असे खासदार नीलेश लंके यांनी कार्यकर्त्यांनी सांगितले. तसंच उमेदवारी देण्याचा अधिकार मला नाही. शरद पवार, उध्दव ठाकरे, बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) उमेदवार देणार आहेत. कार्यकर्ता म्हणून तुमच्या भावना मी पक्षश्रेष्ठींसमोर मांडेल. या जिल्हयात प्रत्येक मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी घेतल्याचेही खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.

पारनेर तालुक्यात भावींची चर्चा सुरू आहे. ते भावीच राहणार आहेत. तुम्ही ज्यांच्या अंगावर गुलाल टाकाल तोच तालुक्याचा आमदार होणार आहे. लोकसभा जिंकली आता विधानसभाही आपणच जिंकणार आहोत, असा ठाम विश्‍वास खासदार लंके यांनी कार्यकर्त्यांमध्ये भरला. पारनेर-नगर मतदारसंघातील 362 बुथपैकी केवळ 27 बूथवर आपणास कमी मतदान झाले असून या बूथवरही मतदान वाढविण्यासाठी नियोजन करण्याची जबाबदारी आपली असल्याचे खासदार लंके यांनी सांगितले.

महिलांच्या नेतृत्वाला संधी द्या

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पारनेर महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सुवर्णा धाडगे यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघातून महिला नेतृत्वाला संधी देण्याची मागणी केली. खासदार नीलेश लंके यांच्या पाठिशी लोकसभा निवडणुकीत जसे एकसंघपणे उभे राहिलो, तसेच आम्ही विधानसभा निवडणुकीत ठाम राहू. याच फळीच्या जोरावर उत्तरेचे आक्रमण आपण परतवून लावले. महिला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत दमदार बॅटींग केली. विधानसभेलाही हीच टीम अग्रभागी असेल. लोकसभेची पेरणी राणी लंके यांनी तीन ते चार वर्षे केली. आता महिलांच्या नेतृत्वाला विधानसभेत पाठविण्याची जबाबदारी आपली आहे, असे सुवर्णा धाडगे यांनी म्हटले.

मताधिक्य देणाऱ्या गटाला 5 लाखांचे बक्षिस

राणी लंके यांची उमेदवार निश्‍चित आहे, असा दावा नीलेश लंके प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष सुदाम पवार यांनी केला. विरोधकांकडे भावींची मोठी गर्दी आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या पध्दतीने आपण प्रचार केला, त्याच पध्दतीने प्रचार करून राणी लंके यांना विधानसभेत पाठवायचे आहे. जिल्हा परिषदेचा जो गट सर्वाधिक मताधिक्य देईल, त्या गटाला 5 लाखांचे बक्षिस देण्यात येईल. खासदारकी, आमदारकी आपल्याकडेच असणार आहे. त्यामुळे निधीची कमतरता भासणार नाही, असे दावा सुदाम पवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT