shrikant shinde.jpg sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shrikant Shinde : नाशिकमध्ये आलेले, श्रीकांत शिंदे ताकही फुंकून 'प्यायले'!

Sampat Devgire

शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणूक प्रचाराची सुरुवात आमदार आदित्य ठाकरे यांनी नाशिकहून केली. शिवसेना शिंदे गटाने ही तोच कित्ता गिरवला. खासदार शिंदे शुक्रवारी नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

या दौऱ्यात लोकसभा निवडणुकीत खासदार शिंदे ( Shrikant Shinde ) यांनी उमेदवारी जाहीर केलेले माजी खासदार हेमंत गोडसे यांचा पराभव झाल्याचे शल्य त्यांच्या देहबोलीतून जाणवत होते. या निवडणुकीत शिंदे गटाचा पराभव झाला, त्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे असहकार्य कारणीभूत होते.

यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी खासदार शिंदे बोलण्याआधी थोडे सावध झाले. याबाबत महायुतीच्या बैठकीत काय वादविवाद झाला? यावर प्रश्नावर त्यांनी कानावर हात ठेवले. उलट प्रश्न विचारणाऱ्यालाच, 'तुम्ही तिथे होता काय' असा प्रतिप्रश्न करून निरुत्तर केले.

"महायुतीतील तीनही पक्ष अतिशय उत्तम समन्वय करीत आहेत. सर्व पदाधिकारी आणि नेत्यांमध्येही चांगला संवाद होतो. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे तीनही पक्ष पुन्हा सत्तेवर येतील," असा विश्वास खासदार शिंदे यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीत खासदार शिंदे यांनी माजी खासदार गोडसे ( Hemant Godse ) यांना परस्पर उमेदवारी जाहीर केली होती. त्याला सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आक्षेप घेत उमेदवारीसाठी दावा केला होता. त्यानंतर भाजपनेही जागा आम्हीच लढवणार अशी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यातून मार्ग काढता काढता मुख्यमंत्री शिंदे यांना एक महिन्याचा कालावधी लागला होता. हा अनुभव गाठीशी असल्याने खासदार शिंदे यांनी जागा वाटपाबाबत विधान करण्याचे टाळले.

मतदारसंघाच्या जागा वाटपाबाबत श्रीकांत शिंदे म्हणाले, "ते माझे काम नाही. मला त्याबाबत काहीही माहिती नाही. उमेदवारीचा आणि जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. मी फक्त पक्षाच्या विस्तारासाठी आणि आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असंख्य योजना राबवल्या. सामान्य जनता त्यांच्यावर आनंदी आहे. असे कार्यकर्ते आणि जनतेचे मत मला दिसले. त्याबाबतच कार्यकर्त्यांशी चर्चा केली. प्रत्येक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात असे आवाहन मी करीत आहे."

एकंदरीत लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या मतदारसंघावरून महायुतीत शेवटपर्यंत वाद झाला होता. त्यापासून खासदार शिंदे यांनी चांगला धडा घेतलेला दिसतो. त्यामुळेच दुधाने पोळकेले खासदार शिंदे नाशिकला आल्यावर ताकही फुंकूनच प्यायले, असे त्यांच्या दौऱ्यात दिसले.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT