Anil Parab With ST Buses
Anil Parab With ST Buses Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`एसटी`चे तुघलकी फर्मान; ज्येष्ठांच्या सवलतीचे वय ६५ वर्षे!

Sampat Devgire

नाशिक : देशभरातील सगळ्या सार्वजनिक वाहतूक (Public Transport) व्यवस्थांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचं (sineor citizen) वय ६० गृहित धरलं जातं. अगदी रेल्वेच्या सवलतीसाठीही ६० वर्षांची वयोमर्यादा आहे. सरकारी, (Government) निमसरकारी सगळ्या आस्थापनांमध्येही ६० वर्षांवरील नागरिक ज्येष्ठ नागरिक मानले जातात. एसटीमध्ये मात्र ही वयोमर्यादा ६५ वर्षे आहे. या तुघलकी फर्मानाद्वारे एसटीने ज्येष्ठांचा छळ मांडलाय. (MSRTC increased sinior citizens age limit from 60 to 65 years)

हे असं का आहे, याचं कोणतंही तार्किक उत्तर एसटीकडे नाही. जेव्हा निम्न आर्थिक गटातील ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न येतो, तेव्हा त्यांच्यासमोर एसटीच्या प्रवासाशिवाय अन्य कुठलाही मार्ग नसतो. साधारणपणे निवृत्तीनंतर सुरवातीच्या वर्षांमध्ये तब्येतीची स्थिती उत्तम असल्यानं फिरण्यासाठी हा सर्वोत्तम वयोगट आहे. मात्र एसटीच्या प्रवासात सवलतीत प्रवास करता येत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची मोठी अडचण होते. केंद्राची आणि देशभरात सर्वच राज्यात ६० वर्षांची मर्यादा असताना राज्यात एसटीमध्ये ६५ वयोमर्यादा आकलनापलीकडची आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी या संदर्भात लक्ष घातल्यास हे मुद्दे चुटकीसरशी सुटणारे आहेत.

संपाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडत एसटी रस्त्यांवर धावू लागली आहे. एसटी मागचं शुक्लकाष्ठ एकदम कमी होणार नाही. एसटीला ऊर्जितावस्थेत आणायचं झाल्यास त्यासाठी सर्वच पातळीवर भरपूर कष्ट घ्यावे लागणार आहेत. पण एसटीची ओळख म्हणजे ‘गाव तेथे एसटी’. राज्यातील खेड्या-पाड्यांवर एसटी जाते, सामान्यांचा ती आधार ठरते. विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या हक्काचं वाहतुकीचं साधन म्हणजे एसटी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेनं जगभर मान्य केलेलं तत्त्व म्हणजे प्रसंगी तोटा सहन करत सामान्यांची सोय या व्यवस्थेद्वारे व्हावी. याचा अर्थ तोटा सहन करत रडतकढत सगळ्या वाहतूक व्यवस्था चालायला हव्यात, असं अजिबात नाही. फायद्यात येण्यासाठी जी तंत्रे वापरावी लागतील, ती सगळी वापरण्याची मुभा नक्कीच आहे.

ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणारा एसटीच्यासंदर्भात अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे स्मार्ट कार्ड योजना. पूर्वी असलेली सवलतीची पद्धत एसटीनं बंद केली आहे. स्मार्ट कार्ड प्रीपेड असल्याने रक्कम आगावू एसटीकडे जमा करावी लागते. अनेकदा स्मार्ट कार्डची प्रीपेड रक्कम संपेपर्यंत प्रवास होतही नाही. बरं हे स्मार्ट कार्ड घेण्यासाठी लांबच लांब रांगांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना उभे राहावे लागते. त्यामुळे तहसीलदाराच्या शिक्क्याने मिळणारी आधीची सवलतीची योजना पुन्हा सुरू करावी, अशी ज्येष्ठ नागरिकांची आग्रही मागणी आहे. जेवढा प्रवास करू तेवढे पैसे एसटीच्या तिजोरीत पडणार आहेतच. मग आगावू पैसे जमा करून घेण्याचा खटाटोप एसटीने करू नये, असे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.

‘सकाळ माध्यम समूहा’च्या माध्यमातून काही महिन्यांपासून ज्येष्ठ नागरिक संवाद कार्यक्रम सुरू आहे. या प्रत्येक कार्यक्रमात एसटी संदर्भातील उपरोक्त दोन मुद्यांचा आवर्जून उल्लेख ज्येष्ठ नागरिक करत आहेत. एसटीच्या वयोमर्यादा संदर्भातील अट तर अतिशय जाचक असल्याचे अनेक ज्येष्ठांनी कथन केले.

ऐरवी अनेकदा अनेक मार्गांवर बस रिकाम्या धावतात. पण जर सवलतीत प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक एसटीने प्रवास करणार असतील, तर ते एसटीला नकोय का, अशी भावनाही अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. स्मार्ट कार्ड योजनेमुळेही ज्येष्ठ एसटीकडे पाठ फिरवण्याच्या मानसिकतेत आहेत. हा हक्काचा प्रवासी वर्ग एसटीला गमवायचा नसेल, तर या दोन्ही विषयांत एसटी प्रशासनाने बदल केल्यास एसटीला तोट्याऐवजी काही प्रमाणात का होईना फायदा नक्कीच होईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीददेखील सार्थ ठरेल.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT