Shirdi Saibaba Sansthan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shirdi Saibaba Sansthan : राज्य सरकारकडून साई संस्थानचे 'CEO' तडकाफडकी कार्यमुक्त!

Nagpur Winter Session : नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच आदेश निघाल्याने चर्चेला उधाण

Pradeep Pendhare

Shirdi News : शिर्डी येथील साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सीवा. शंकर यांच्या बदलीचा राज्य सरकारने तडकाफडकी आदेश काढला आहे. आपल्याकडील कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे सोपवून कार्यमुक्त व्हावे आणि पुढील आदेशाची प्रतिक्षा करावी, असे आदेशात म्हटले आहे. नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच आदेश निघाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी मंगळवारी बदलीचा आदेश काढला. पी. सीवा. शंकर यांची मे 2023 रोजी शिर्डीच्या(Shirdi ) साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली होती.

अवघ्या सात महिन्यात पी. सीवा. शंकर यांच्या बदली झाली. गेल्या आठवड्यातच शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन बदलीची मागणी केली होती. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा बुधवारी समारोप होत असतानाच हा बदलीचा आदेश निघाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पी. सीवा. शंकर पूर्वी नागपूर शहरात वस्त्रोद्योग संचालक म्हणून कार्यरत होते. तेथून त्यांची मे 2023 मध्ये साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली. तत्पूर्वीच्या शिर्डी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत-धिवरे देखील नागपूर येथील रेशीम उद्योग संचालनालयात संचालक म्हणून कार्यरत होत्या.

पी. सीवा. शंकर हे 2011 च्या बॅचचे कॅडर आहेत. नागपूर येथे कार्यरत होण्यापूर्वी ते सोलापूर महापालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत होते. आपल्याला महाराष्ट्रात दहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे आपण केडर बदलास पात्र आहोत. यासंदर्भातील अर्ज केंद्र सरकारला पी. सीवा. शंकर यांनी सादर केल्याचे समजते. पी. सीवा. शंकर यांना आंध्रप्रदेशातील टोबॅको बोर्डात बदली हवी आहे.

दरम्यान. पी. सीवा. शंकर यांना तातडीने त्यांचा कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे देण्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे कोणत्या अधिकाऱ्याकडे साईबाबा संस्थानचा प्रभारी कार्यभार जातो, याकडे देखील लक्ष लागले आहे.

साईसंस्थानवर विश्वस्त मंडळाची नियुक्ती करा -

साई संस्थानचा कारभार पाहण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्त करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्रिसदस्यीय समिती हटवून संस्थानवर लवकरात लवकर विश्वस्त मंडळ नेमण्याची मागणी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

संस्थानवर असलेली त्रिसदस्यीय समिती ही शिर्डीकरांसाठी सकारात्मक नसल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष तथा साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त शिवाजी गोंदकर यांनी व्यक्त केली. साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांमध्ये संवाद राहावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री यांनी लवकर निर्णय घेऊन साईबाबा संस्थानवर विश्वस्त मंडळ नियुक्त करावे, अशी मागणी शिवाजी गोंदकर यांनी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT