Nandurbar DPC Fund Dispute : नंदुरबार जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपातील वाद चव्हाट्यावर आला आहे. असमान निधी वाटपावरुन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे विधानपरिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी हे आपल्या पक्षाच्या दोन मंत्र्यासमोर भावूक झाले. आपल्या भाषणात रघुंवशी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपातील असमानतेचा मुद्दा उपस्थित करत खंत व्यक्त केली. यावेळी त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याचे पाहायला मिळाले.
नंदुरबार जिल्ह्यात महायुतीमध्ये सर्वकाही अलबेल नसून गेल्या काही महिन्यांपासून धुसफूस आहे. जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमश्या पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी असे दोन आमदार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या ठरलेल्या निधी वाटपाच्या सुत्रानुसार या दोन्ही आमदारांच्या वाटेला अत्यल्प निधी येत असल्याने कार्यकर्त्यांची कामे करायची कशी, अशी हतबलता रघुवंशी यांनी मांडली. मंत्री उदय सामंत व गुलाबराव पाटील यांच्यासमोरच त्यांना रडू कोसळले. याबाबत थेट वरिष्ठ पातळीवर पक्षनिहाय निधी देण्याची विनंती त्यांनी दोन्ही मंत्र्यांना केली.
यावरुन पक्षाच्या जिल्हा मेळाव्यात मंत्री उदय सामंत आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी मित्रपक्षांसह विरोधकांवर टीकास्र डागलं. मित्रपक्षांना टोला लगावताना ‘निंदकाचे घर असावे शेजारी, तो आपला असला तरी चांगला आणि परका असला तरी चांगला,’ असे सूचक वक्तव्य सामंत यांनी केले.
शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष पाहायचा
मंत्री उदय सामंत यांनी शिवसैनिकांना आगामी काळातील राजकीय वाटचालीबाबत मोठा विश्वास दिला. एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास असणाऱ्या एकाही शिवसैनिकाचा विश्वासघात अथवा अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन सामंत यांनी मेळाव्यात दिले. नंदुरबारमध्ये प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना वाटचाल करत असून, भविष्यात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शिवसेनेचा असला पाहिजे, असा निर्धारही सामंत यांनी व्यक्त केला. तसेच आगामी काळात नंदुरबारमध्ये शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष व्यासपीठावर बसलेला पाहायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘मी आणि गुलाबराव पाटील या जिल्ह्याचे आमदार म्हणून काम करू,’ असे सांगत उदय सामंत यांनी नंदुरबारमधील शिवसैनिकांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांच्या अडचणी पालकमंत्र्यांच्या कानावर घालून त्या सोडवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
उद्योजकांचीही गय नाही
मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्यांवरही त्यांनी निशाणा साधला. लंडनमध्ये एकनाथ शिंदे यांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली, ही अभिमानाची बाब असल्याचे सामंत म्हणाले. उद्योग विभागाच्या माध्यमातून नंदुरबारमध्ये आदिवासी उद्योग क्लस्टर उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, जाणीवपूर्वक शिवसैनिकांना त्रास देणाऱ्या उद्योजकांचीही गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.