Nashik News: विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिकला सभा झाली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची यादीच मांडली. या संख्येमुळे उपस्थितही चक्रावून गेले.
नाशिक येथे झालेल्या पंतप्रधान मोदी यांच्या सभेत चंद्रकांत बावनकुळे यांनी महायुतीच्या सरकारने सामान्यांसाठी केलेल्या कामांची यादीच वाचून दाखवली. महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार आहे. त्यामुळे सामान्यांच्या विकासासाठी प्रचंड मोठे काम झाले आहे.
विविध योजनांचा लाभ थेट नागरिकांना होत आहे. त्यामुळे विरोधक दुःखी आहे. विरोधकांनी सत्तेत असताना राज्यातील जनतेसाठी काहीही केले नाही. त्यामुळेच महायुतीच्या सरकारकडून होणाऱ्या कामांबाबत अडथळे उभे केले जात आहेत.
यावेळी बावनकुळे यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ किती नागरिकांना झाला, याची एक यादीच मांडली. महाराष्ट्रात 6.84 कोटी जनतेला पंतप्रधान मोदी मोफत धान्य देत आहेत. गेल्या दहा वर्षात देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे यावा यासाठी मोदी यांनी मदत केली आहे.
राज्यात 23 लाख लोकांना घरे देण्यात आली. 1.64 कोटी घरांमध्ये नळ देण्यात आले. तीन कोटी नागरिकांना आयुष्यमान विमा योजनेचा लाभ मिळाला. 1.71 कोटी नागरिकांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळाला. 1.31 कोटी जनतेला जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ देण्यात आला.
शेतकऱ्यांना सुलभ मिळावे यासाठी राज्यात 87 लाख शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले. 10.40 लाख लोकांना अटल पेन्शन योजनेचा लाभ मिळत आहे. 77 लाख घरांमध्ये शौचालये बांधण्यात आली आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने महिलांना सक्षम करण्यासाठी 2.34 लाख महिलांना दरमहा 2100 असे वर्षाला 25000 रुपये देण्यात येत आहेत. 44 लाख शेतकऱ्यांचे विज बिल महायुती सरकारने माफ केले आहे. पुढील पाच वर्षे त्यांना कोणतेही बिल भरावे लागणार नाही. राज्यात 25 लाख लखपती दीदी तयार करण्यासाठी आमचे सरकार काम करीत आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात देखील महायुतीचे सरकार जनतेसाठी भरघोस काम करील, असा दावा त्यांनी केला. काँग्रेसचे केंद्रात सरकार असताना त्यांनी महाराष्ट्रासाठी केवळ एक लाख कोटी रुपयांची मदत केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीत गेल्या दहा वर्षात दहा लाख कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे.
राज्यातील महायुतीचे सरकार म्हणजे राज्याचा सन्मान आणि महाविकास आघाडी म्हणजे राज्याचा अपमान आहे. महायुतीचे सरकार प्रगती तर महाविकास आघाडी अधोगती महायुती अशा तर महाविकास आघाडी निराशा आहे. महायुती हा जनतेसाठी आदर तर महाविकास आघाडी तिरस्कार आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत जनतेने पुन्हा एकदा महायुतीला सत्तेत आणावे असे आवाहन त्यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.