Narhari Zirwal  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Narhari Zirwal : लाचखोरीचा सिक्रेट कोडवर्ड कळताच मंत्री झिरवाळ अ‍ॅक्शन मोडवर, खासगी सचिवाला केलं कार्यमुक्त

Narhari Zirwal, Ramdas Gade : लिपीक राजेंद्र ढेरिंगे यांच्यावरील कारवाईनंतर आता मंत्री झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्यावरही मंत्री झिरवाळ यांनी अॅक्शन घेत त्यांना कार्यमुक्त केलं आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लिपीक राजेंद्र ढेरिंगे यांना ३५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. सध्या ढेरिंगे हे पोलिस कोठडीत आहे. परंतु याप्रकरणामुळे मंत्री झिरवाळ यांची मोठी बदनामी झाली. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.

लिपीक राजेंद्र ढेरिंगे यांच्यावरील कारवाईनंतर आता मंत्री झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांचेही याप्रकरणात नाव पुढे येऊ लागले आहे. याप्रकरणी मंत्री झिरवाळ यांनी तत्काळ कारवाई केली असून रामदास गाडे यांना आपल्या स्वीय सहाय्यक पदावरून कार्यमुक्त केले आहे. गाडे यांची रवानगी मूळ विभागात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी एसीबीने मंत्रालयात छापा टाकला त्या दिवशी रामदास गाडे हे मंत्री झिरवाळ यांच्यासोबत दिल्लीला होते. मात्र तरीही लिपीक राजेंद्र ढेरिंगे यांनी याप्रकरणात झिरवाळ यांचे स्वीय सहाय्यक यांचे नाव घेतल्याची माहिती आहे. गाडे यांच्या सांगण्यावरुन आपण लाच स्विकारल्याचे ढेरिंगे यांनी तपास यंत्रणांना सांगितल्याचे सूत्रांकडून कळते.

दरम्यान, झिरवाळ यांच्या कार्यालयात लाच घेण्यासाठी कथित ‘सिक्रेट कोडवर्ड’ वापरला जात असल्याचा आरोप एका मेडिकल दुकानदाराने केला आहे. निर्मला शर्मा असे या दुकानदाराचे नाव आहे. त्याने स्टिंग ऑपरेशन करुन गुप्तरित्या व्हिडीओ काढला, जो आता व्हायरल झाला आहे. लाच घेण्यासाठी फाईलवर पेनाने एक लाईन मारणे म्हणजे 50 हजार रुपये, तर दोन लाईन म्हणजे 1 लाख रुपये अशी खूण वापरली जात असल्याचा दावा शर्मा यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात डॉ. गाडे यांचे नाव समोर आले आहे.

मेडिकल दुकानदार निर्मल शर्मा यांच्या मेडिकलचा परवाना काही त्रुटी असल्याने एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला होता. त्याविरोधात त्यांनी 7 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात अपील दाखल केले होत. त्यावर 13 फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली. सुनावणीसाठी मंत्रालयात गेलेल्या शर्मा यांना डॉ. गाडे यांच्यासमोर बसवण्यात आलं. गाडे व लिपीक ढेरिंगे यांच्यात चर्चा होऊन लिपिक राजेंद्र ढेरंगे यांनी कथितरित्या 1 लाख 10 हजार रुपयांची मागणी केल्याचा दावा निर्मल शर्मा यांनी केला. त्यातील 1 लाख वरच्या अधिकाऱ्यांसाठी आणि 10 हजार स्वतःसाठी असे ढेरिंगे यांनी मागितल्याचा दावा शर्मा यांनी केला आहे. शर्मा यांनी रक्कम जास्त असल्याचे सांगितल्यानंतर 50 टक्के सवलत देण्यात आली. त्यांनी 2 हजार रुपये ऑनलाईन गुगल पे द्वारे व 53 हजार रुपये रोख स्वरुपात दिल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.

हे सगळं प्रकरण पाहाता मंत्री झिरवाळ यांनी आपले खासगी सचिव रामदास गाडे यांना तातडीने कार्यमुक्त केलं आहे. यासंबंधीचे पत्र झिरवाळ यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहे. गाडे हे झिरवाळ यांच्या मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर होते. पण आता त्यांची सेवा त्यांच्या मूळ विभागात (कृषि व पदुम विभाग) वर्ग करण्यात आली आहे. झिरवाळ यांनी या प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाला तातडीने आदेश काढण्याचे निर्देश दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT