Nashik Municipal Corporation , Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik BJP : गिरीश महाजनांचा कारभार, तंट्याला नाही तोटा, नाशिक भाजपमध्ये 6 महिन्यात 6 वेळा राडा

Nashik BJP internal conflict : गेल्या सहा महिन्यात नाशिकमध्ये भाजपमध्ये ज्या घडामोडी घडल्या ते पाहाता सर्व काही अलबेल नाही हेच स्पष्ट होते. अनेकदा पक्षातील अतर्गत वाद चव्हाट्यावर आले.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 122 पैकी स्वबळावर एकट्याने 72 जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. शिवाय एकमेव अर्ज दाखल झाल्याने नाशिक महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या खूर्चीवर भाजपच्याच नगरसेवक हिमगौर-आहेर आडके या बसणार हे निश्चित झाले आहे. तर उपमहापौरपदासाठीही भाजपने मच्छिंद्र सानप यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. उद्या ६ फेब्रुवारी महापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे.

परंतु महापौरपदाचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजप अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. काही नाट्यमय घडामोडी नाशिकमध्ये घडल्या. महापौर व उपमहापौर पदासाठी आपल्या पसंतीच्या नगरसेवकांना संधी न दिल्यामुळे भाजप शहराध्यक्ष सुनिल केदार यांनी काल तडकाफडकी राजीनामा दिला. पक्षश्रेष्ठींकडून वेगळी नावे आली असताना स्थानिक पातळीवर ती नावे बदलली गेल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रत्यक्षात मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री फडणवीसांनी सूचवलेल्या नावांचीच घोषणा केली असताना एकप्रकारे प्रदेशाध्यक्ष केदार यांनी महाजन यांनाच आव्हान दिलं. मात्र, पक्षश्रेष्ठींकडून कानउघडणी होताच चोवीस तासांच्या आत शहराध्यक्ष केदार यांनी यु टर्न घेत आपला राजीनामा मागे घेतला.

ज्या कारणांमुळे मी भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्या विषयांवर प्रदेश भाजप बरोबर माझी सविस्तरपणे चर्चा झाली आहे. माझे समाधान झाल्याचा हास्यास्पद दावा त्यांनी केला. प्रदेश भाजपच्या सुचनेनुसार मी माझा राजीनामा मागे घेतला आहे असे केदार यांनी सांगितले. मात्र या सगळ्या घडामोडींमुळे भाजपमधील अतंर्गत वाद चव्हाट्यावर आला.

मात्र नाशिक भाजपमध्ये अशा नाट्यमय घटामोडी काही पहिल्यांदा घडल्या नाही. नाशिक भाजपमध्ये तंटा अर्थात वाद, कलह, मतभेद यांना काही तोटा नाही. निवडणूक लागल्यापासून गेल्या सहा महिन्यात पक्षांतर्गत किमान सहा वेळा घडलेले सहा नाट्यमय घडामोडी घडल्या. या राड्यांमधून भाजपमधील अंतर्गत मतभेद पूर्णपणे चव्हाट्यावर आले.

१. सीमा हिरे विरुद्ध सुधाकर बडगुजर

या राड्यांना सुरुवात झाली ती भाजपमध्ये स्थानिक आमदारांना डावलून पक्षश्रेष्ठींकडून होत असलेल्या इनकमिंगपासून. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांना स्थानिक आमदार सीमा हिरे यांचा विरोध झुगारुन 17 जून 2025 रोजी भाजप प्रवेश देण्यात आला. बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाला आमदार सीमा हिरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे विरोध दर्शविला होता. सीमा हिरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे या पक्षप्रवेशाविरोधात धाव घेतली होती.

२. आमदार राहुल ढिकले विरुद्ध गणेश गिते

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधात बंडखोरी करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडूनकडून उमेदवारी केलेले स्थायी समिती माजी सभापती गणेश गिते यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करण्यात आला होता. मात्र मंत्री गिरीश महाजन यांनी ढिकले यांची समजूत घालत त्यांच्याच उपस्थितीत ३ जुलै २०२५ रोजी गिते यांना भाजपमध्ये प्रवेश दिला.

३. आमदार ढिकलेंना झटका

भाजपचे नाशिक महापालिका निवडणूक प्रमुख आमदार राहुल ढिकले यांनी एका जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यावरुन पक्षाने त्यांना झटका दिला होता. ढिकलेंनी मी निवडणूक प्रमुख असून माझी रॅली अडवणाऱ्यांना आता आस्मान दाखवेल अशी भाषा केली होती. त्यानंतर त्यांना पदावरून दूर करत आमदार देवयानी फरांदे यांची निवडणूक प्रमुख पदी नियुक्ती केली. या नियुक्तीवरुन आमदारांमध्ये मतभेद निर्माण झाले. त्यानंतर पक्षाने वादावर पडदा टाकण्यासाठी दोघांवरही जबाबदारी असल्याचे सांगितले. १९ व २० डिसेंबर दरम्यान या घडामोडी घडल्या.

४. आमदार फरांदेंचा शाहू खेरैंच्या प्रवेशाला विरोध

आमदार फरांदे यांनी प्रभाग 13 मध्ये होत असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे व उबाठाचे नेते विनायक पांडे यांच्या भाजप पक्षप्रवेशाला जाहीरपणे विरोध केला होता. आमदार फरांदे यांचे समर्थक कार्यकर्ते हेही आक्रमक झाले होते. अगदी आमदार फरांदे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. मात्र तरीही मंत्री गिरीश महाजन यांनी शाहू खैरै यांच्यासह विनायक पांडे, यतीन वाघ यांना 25 डिसेंबर 2025 रोजी भाजपमध्ये प्रवेश दिला. यावेळी हे जे काही घडलं ते आपल्याला न आवडल्याचे जाहीरपणे फरांदे यांनी बोलून दाखवले होते.

५. एबी फॉर्म वाटपवाचा गोंधळ

महापालिका निवडणूकीसाठी उमेदवारांनी एबी फॉर्म वाटप करताना भाजपमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. 30 डिसेंबर 2025 रोजी एबी फॉर्म घेऊन जाणाऱ्या शहराध्यक्ष सुनिल केदार यांच्या गाडीचा इच्छुकांनी पाटलाग केला होता. एबी फॉर्म वाटपावेळी आमदार समर्थकांमध्ये धक्काबुकी होऊन पक्षाची बदनामी झाली. सुधाकर बडगुजर व मुकेश शहाणे यांच्यात वाद झाले. एकाच प्रभागात दोन जणांना एबी दिले गेले. मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद झाला. या प्रकरणी शहराध्यक्ष केदार यांच्यावरच गोंधळाचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर नाशिकरोड येथे नाराजांनी केदार यांना गाजरही भेट दिले होते.

६. अन् आता गिरीश महाजन अन् शहराध्यक्षांमध्ये मतभेद

३ फेब्रवारी 2026 रोजी महापौर व उपमहापौरपदाची नावे जाहीर करण्यावरून पुन्हा शहराध्यक्ष केदार यांनी मंत्री महाजन यांनाच उघडपणे विरोध केला. महाजन यांनी महापौरपदासाठी हिमगौरी आहेर-आडके यांचे तर उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांचे नाव घोषित केले. आपल्या पसंतीच्या नगसेवकांना संधी न दिल्याने सुनिल केदार यांनी पदाचा राजीनामा दिला. भाजपमधी अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. पक्षश्रेष्ठींनी केदार यांची कानउघडणी केली अन् अवघ्या चोवीस तासांच्या आत केदार यांनी आपला राजीनामा मागे घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT