Nashik Mayor Politics : नाशिक महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी उद्या (दि. ६) फेब्रुवारी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. नाशिक महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत आहे. भाजपने आपले महापौर व उपमहापौर पदाचे दोन्ही उमेदवार फिक्स केलेले आहेत. मात्र बंडाळी टाळण्यासाठी भाजपने खबरदारी घेतली असून नाशिकमधील भाजपचे ७२ नगरसेवक एक दिवसाच्या सहलीसाठी अज्ञातस्थळी गेले आहेत.
नाशिकमध्ये भाजपचे स्वबळावर ७२ नगरसेवक निवडून आलेले आहेत. महापौरपदासाठी भाजपच्या नगरसेविका हिमगौर आहेर-आडके तर उपमहापौरपदासाठी नगसेवक मच्छिंद्र सानप यांच्या नावाची घोषणा भाजपने केली आहे.
दोघांनीही अर्ज दाखल केलेले आहेत. उद्या महापौर आणि उपमहापौरांची अधिकृतपणे निवड प्रक्रिया होणार असल्याने आज (गुरुवारी) भाजपच्या सर्व म्हणजे ७२ नगरसेवकांना पक्ष कार्यालयात बोलावण्यात आले होते.
नाशिकच्या भाजपच्या ७२ नगरसेवकांना शहराध्यक्ष सुनिल केदार व मंत्री महाजन यांनी सकाळी पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात बॅगा घेऊन बोलावले होते. यानंतर सर्व नगरसेवक सहलीसाठी अज्ञात ठिकाणी रवाना झाले. त्यामुळे भाजपला स्पष्ट बहुमत असतानाही बंडाळीची भीती असून आपल्या नगरसेकांवर भरोसा नाही का अशी चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
नगरसेवक फुटीच्या भीतीने भाजपने आपल्या सर्व ७२ नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवले आहे. भाजपमध्ये एबी फॉर्म वाटपावेळी झालेला राडा ते महापौर व उपमहापौरांच्या निवडीवरुन शहराध्यक्ष केदार यांनी दिलेला राजीनामा व त्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून झालेल्या कानउघडणीनंतर पुन्हा मागे घेतलेला राजीनामा यामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
नाशिकमध्ये शिवसेनेने देखील उपमहापौरपदासाठी उमेदवार दिले आहेत. शिवसेनेचे विलास शिंदे, प्रवीण तिदमे, राहुल दिवे यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलेले आहेत. तर शिवसेना उबाठाने देखील महापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. उबाठाच्या प्रभाग क्रमांक १५ मधून निवडून आलेल्या सीमा पवार यांनी महापौरपदासाठी अर्ज भरलेला आहे.
अशात भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने काही अडचण नाही. मात्र, तरीही सर्व पार्श्वभूमी पाहाता खबरदारी म्हणून पक्षासोबत कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून भाजपने आपल्या सर्व ७२ नगरसेवकांना इगतपुरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नेल्याचे बोलले जात आहे.
हे सर्व ७२ नगरसेवक उद्या (शुक्रवारी) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास थेट महापालिकेत हजर होतील. त्यानंतर सकाळी ११ वाजता नवीन महापौर आणि उपमहापौराची निवड होईल. आज (गुरुवारी) खुद्द मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये दाखल होत भाजपच्या सर्व नगरसेवकांना सकाळी पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात बोलवले. याठिकाणी सर्व नगरसेवक नाश्ता करून एका दिवसाच्या सहलीसाठी रवाना झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.