Nashik News : न्यायालय व न्यायाधीशांच्या निवासस्थानाच्या परिसरात बेकायदेशीर प्रवेश करून संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोघांना नाशिकच्या चांदवड न्यायालयाने विविध कलमांन्वये दोषी ठरवत एक वर्षाच्या सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालय परिसराच्या सुरक्षेशी तडजोड सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या निकालातून देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी नितीन राजेश चव्हाण (२८) व विश्वास बबन गांगुर्डे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३२९(४), ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ८५(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास दोघेही चांदवड न्यायालय परिसरात संशयास्पद हालचाली करताना आढळले. यावेळी दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. धक्कादायक बाब म्हणजे, प्लास्टिकच्या गोणीत स्क्रू ड्रायव्हर घेऊन त्यांनी बंद असलेले न्यायालयाचे गेट उघडले व आत शिरले. आतमध्ये ते संशयास्पद फिरत होते.
त्यांनी मुख्य प्रवेशद्वारातून न्यायालय परिसरात तसेच न्यायाधीशांच्या निवासस्थानाच्या परिसरात अनधिकृत प्रवेश केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. तपासात भंगार वेचण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रकरणी न्यायालयाचे अधीक्षक मनोज मंडाले यांनी चांदवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पोलिस एस. आर. राऊत यांनी केला, तर ॲड. राकेश वाळके यांनी सरकारी पक्षातर्फे कामकाज पाहिले.
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वृषाली सुंगारे यांनी आरोपींना भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३) व ३२९(४) अंतर्गत प्रत्येकी एक वर्ष सक्त कारावास, तसेच दंडाची शिक्षा सुनावली. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ८५(१) अंतर्गत तीन महिन्यांच्या साध्या कारावासाचीही शिक्षा ठोठावण्यात आली.
न्यायालय परिसराच्या सुरक्षेला बाधा आणणाऱ्या प्रकारांविरोधात न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्याने या निर्णयाकडे कायदे वर्तुळात महत्त्वपूर्ण निकाल म्हणून पाहिले जात आहे. विशेष म्हणजे पाच महिन्यांतच या खटल्याचा निकाल लागला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.