BJP corporator Prashant Dive Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime : ‘घर व प्लॉट खाली कर, नाहीतर नवऱ्याला विहिरीत फेकू’, महिलेला धमक्या दिल्याने भाजप नगरसेवकासह तिघांवर गुन्हा दाखल

Nashik woman threat case : कायद्याचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये चक्क लोकप्रतिनिधीच जमिनी हडप करण्यासाठी अशाप्रकारे धमक्या देत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : राहते घर व त्या शेजारील रिकामा भूखंड रिकामा करण्यासाठी एका महिलेला सातत्याने धमकावणे, अश्लील शिवीगाळ करणे तसेच जबरदस्तीने जागा हस्तांतरित करण्यासाठी दबाव टाकल्याप्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलिस ठाण्यात प्रभाग क्रमांक 17 चे भाजप नगरसेवक प्रशांत दिवे यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी सिद्धेश्वर नगर, जुना सायखेडा रोड, जेलरोड येथील एका विवाहित महिलेने पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार नगरसेवक प्रशांत अशोक दिवे यांच्यासह वसंत गुलाब पाटील, प्रशांत गुलाब पाटील यांच्याविरोधात विविध कलमान्वये उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत नोंदवलेल्या तक्रारीनुसार, महिलेच्या राहत्या घराशेजारीच सुमारे 190 वाराचा मोकळा प्लॉट आहे. या भूखंडाचा ताबा मिळविण्यासाठी संशयितांकडून महिलेला आणि त्यांच्या कुटुंबीयांना वारंवार त्रास दिला जात होता. जेणेकरुन पीडित महिलेने कुटुंबीयांसह वैतागून ते घर व प्लॉट सोडून निघून जावे.

यापूर्वीही फिर्यादी महिलेने उपनगर पोलिसांत संबधितांविरोधात शिवीगाळ, दमदाटी तसेच अश्लील वर्तनाबाबत तक्रार केली होती. त्यानंतर काही दिवस हा प्रकार थांबला होता. मात्र, आता पुन्हा संबंधितांकडून दबाव वाढविण्यात आल्याचे व त्रास दिला जात असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सोमवारी (दि. ५) सकाळी साडेदहाच्या सुमारास फिर्यादी महिला किराणा सामान घेऊन घरी परतत असताना कॉलनीतील विहिरीजवळ त्यांना अडविण्यात आले. विहिरीजवळ उभ्या असलेल्या वसंत गुलाब पाटील याने महिलेला अडवून धमकी दिली. 'आणखी किती दिवस त्रास सहन करणार आहेस, नगरसेवक प्रशांत दिवे व माझा भाऊ प्रशांत पाटील यांनी सांगितले आहे की, घर व भूखंड खाली करून दिला नाही, तर तुझ्या नवऱ्याला याच विहिरीत फेकून मारून टाकू,' अशी धमकी देत अश्लील हावभाव करत तिला जवळ ओढले. दरम्यान, या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरसेवकाची दहशत असल्याने तक्रार करण्यास उशीर झाल्याचे फिर्यादी महिलेने पोलिसांना सांगितले. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT