Adv. Ranjana Gawande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Fake Baba Ashok Kharat Nashik Case : महिलांच्या शोषणात भोंदूगिरीचा ‘खरात पॅटर्न’? रंजना गवांदेंनी मांडली धक्कादायक आकडेवारी...

Nashik fake godman Ashok Kharat case sparks outrage as ANiS state secretary Adv. Ranjana Gawande cites anti-superstition law on women exploitation : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, अंनिसच्या अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी महाराष्ट्रातील अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायद्याची ताकद सांगितली.

Pradeep Pendhare

Ashok Kharat Nashik case : नाशिक भोंदूबाबा अशोक खरात याने महिलांच्या लैंगिक शोषणाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळात उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी स्थापन करून चौकशी सुरू केली आहे. अशा भोंदूबाबांना रोखण्यासाठी राज्यात "महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम 2013", हा कायदा आहे. पण त्याच्या अंमलबजावणीबाबात प्रशासकीय पातळीवर कुठेतरी उदासीनता दिसते.

याची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास, प्रशासनाने पुढाकार घेऊन कारवाई केल्यास राज्यातील अशा भोंदूगिरी करणाऱ्या बाबांचे दुकान बंद होईलच, शिवाय त्यांच्या शोषणाला बळी पडणार्‍या शेकडो महिला-मुलींची अब्रू देखील वाचेल, अशी टिप्पणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अ‍ॅड. रंजना पगार-गवांदे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना नोंदवली.

नाशिकमधील (Nashik) अशोक खरात याने भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचे केलेल्या शोषणानंतर महाराष्ट्रातील अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रभाव किती यावर अंनिसच्या राज्य सचिव अ‍ॅड. रंजना पगार-गंवादे यांनी सरकारनामाशी बोलताना मोठे निरीक्षण नोंदवले. या कायद्यानुसार महाराष्ट्रात आतापर्यंत दीड हजारांपेक्षा जास्त गुन्हे दाखल असून, शिक्षेचं प्रमाण 43 ते 44 टक्के एवढं आहे. गुन्ह्याचे प्रमाण वाढवल्यास, तपासाला सक्षम अधिकारी नेमल्यास शिक्षेच्या प्रमाणात वाढ होईल, असेही अ‍ॅड. गवांदे यांनी म्हटलं.

भोंदूगिरीच्या प्रकरणांमध्ये सर्वाधिक शोषणांचे प्रकार महिला (Woman), युवतींबरोबर होतात. जिथं भोंदूगिरी आली तिथं महिलांचं, युवतींचं शोषण आलं. हे प्रमाण धक्कादायक आहे. जवळपास 90 टक्के हे प्रमाण असल्याची माहिती अ‍ॅड. गवांदे यांनी दिली.

'महिला बळी का पडतात? यावर बोलताना रंजना गवांदे यांनी, स्त्रीचा जन्म आजही समाजात स्वागतार्ह मानला जात नाही. अत्याधुनिक समाज निर्माण झाल्याचे आपण सांगतो. कायदे आले आहेत. तरी देखील या समाजात आजही स्त्री शोषणाचीच, भोगाचीच गोष्ट मानली जाते. यातूनच स्त्रीचा जन्म स्वागतार्ह मानला जात नाही. हे दुर्दैव्य आहे,' अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली.

स्त्रीचा जन्म स्वागतार्ह मानले जात नाही

'स्त्रीचा जन्म स्वागतार्ह मानले जात नसल्याने, पुढे मुलीचा गर्भ असल्यास, गर्भपाताचे प्रकार होतात. मुलीच्या जन्मानंतर, तिचं लग्न, तिला होणारं अपत्य, अपत्यामध्ये मुलगा असणं, त्या स्त्रीभोवती कुटुंबाचं भलं होणे, मुला-मुलीचं लग्न होणं, मुलाला नोकरी मिळणं, नवऱ्याची भरभराट होणं, या सगळ्यातच स्त्रीच्या आयुष्याचं सार्थक समजलं जातं. स्त्री देखील तशीच दडपणाखाली वागत राहते,' असं गंभीर निरीक्षण अ‍ॅड. गवांदे यांनी नोंदवलं.

कर्मकांडमध्ये महिलांचं प्रमाण सर्वाधिक

'उपास-तापस करणं, भोंदूबाबांकडे जाणं, त्यांचे आशीर्वाद घेणं, गैरसमजूती-अंधश्रद्धा यातूनच तयार होतात, पुढे यातूनच महिला-मुली भोंदूबाबांना बळी पडतात. उपासाचं प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे. कर्मकांड करण्यामध्ये महिलांचं अलीकडच्या काळात खूपच प्रमाण वाढलं आहे. तिच्यावर आता ही कर्मकांड लादली जाऊ लागलीत. यातून महिला-मुली कुटुंबाच्या भल्यासाठी सतत दडपणात असतात,' असेही अ‍ॅड. गवांदे यांनी म्हटलं.

महिला स्वतःसह मुलींचं शोषण करून घेतात

'अपत्य प्राप्तीसाठी अनेक महिला-मुली, अशा भोंदूबाबांकडे जातात. अशोक खरातकडे अपत्य प्राप्तीसाठीच अनेक स्त्री गेलेल्या आहेत. मुलीचं लग्न होत नाही, म्हणून महिला मुलीला घेऊन बाबांकडे जायचे. यात महिला स्वतः बरोबर मुलींचेही शोषण करून घेतात,' असं गंभीर निरीक्षण अ‍ॅड. गवांदे यांनी नोंदवलं.

भोंदूगिरीला बळी पडणारे तीन गट

भोंदूबाबाला बळी पडण्याचं प्रमाण कोणत्या समाजात आहे, यावर बोलताना अ‍ॅड. गवांदे म्हणाल्या, "यात सुरक्षितांचं प्रमाण सर्वाधिक आहे. शिक्षित, चिकित्सक (खरं-खोट, निष्ट-अनिष्ट) अशा लोकांचं प्रमाण भोंदूबाबांकडे जाण्याचं जास्त आहे. तसं पाहिल्यास भोंदूबाबांकडे जाण्याच्या प्रकारांमध्ये तीन गट पडतात. त्यात गरिबांचा बाबा वेगळा, मध्यमवर्गींचा आणि उच्चभ्रूंचा बाबा वेगळा, असे हे गट करता येतील." खरात, आसाराम, रामपाल हे मोठ्यांचे, उच्चभूंचे बाबा झाले, मध्यवर्गींचे छोटे-मोठे मठ स्थापन केलेले, गरिबांचे पंचक्रोशीतील भगत-मांत्रिक यांचा समावेश असतो, असे निरीक्षण रंजना गवांदे यांनी नोंदवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT