Nashik Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळ्याला ९ महिन्यांचा अवधी बाकी आहे. अशात सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे अतिशय धीम्या गतीने सुरु असून आजूनही साधूग्रामची जागा ताब्यात नाही, त्याचा वाद कायम आहे. होणारी कामे देखील योग्य नसल्याचा आक्षेप घेत साधू मंहतांनी कामात प्रगती दाखवा अन्यथा कुंभमेळ्यात येण्याबाबत विचार करावा लागेल असा इशारा दिला आहे.
सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यासाठी आता आम्ही ४० साधू-महंत नाशिकमध्ये आलो आहोत, त्यांच्या निवासाची पुरेशी व्यवस्था नाही. मग कुंभमेळ्यात ४० हजार साधू-महंत दाखल झाल्यावर प्रशासन त्यांची सोय कशी करणार, असा सवाल करत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजयदास महाराज व श्रीमंत निर्वाणी आखाड्याचे महंत मुरलीदास महाराज यांनी प्रशासनाच्या तयारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महिनाभरात शासनाने साधुग्रामची व्यवस्था न केल्यास कुंभावर बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला.
सिंहस्थ कुंभमेळ्याचा मुख्य ध्वजारोहण सोहळा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. ३१) होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीच्या पाहणीसाठी निर्वाणी आखाड्याचे महंत मुरलीदास महाराज, महंत नरेंद्रदास, महंत हेमंतदास, महंत संजयदास महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज यांनी गुरुवारी (दि. २९) दुपारी रामकुंड परिसराची पाहणी केली. मात्र, रामकुंडासह शाहीमार्गाची स्थिती पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन तिथे दाखल झाले. वाहनात बसलेल्या महंतांची त्यांनी मनधरणी केली. कुंभमेळ्याला ९ महिने बाकी आहेत, मात्र आम्ही चार महिन्यांत सर्व कामे पूर्ण करु असा महाजन यांनी आश्वस्त केले. त्यानंतर तत्काळ अधिकाऱ्यांना पाचारण करीत साधूंनी केलेल्या सूचनांचे पालन करीत कामात सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. लवकरात लवकर कामे आटोपण्याची ताकीद दिली.
.. तर कुंभमेळ्यात येण्याबाबत विचार करु
कुंभमेळ्यासाठी अवघे ९ महिने शिल्लक आहेत. आखाड्यांना त्यापूर्वी जून महिन्याच्या सुमारास जागा मिळणे गरजेचे आहे.आखाड्यांना मिळालेल्या जागेचा विचार करूनच किती खालशांना बोलवायचे याचा निर्णय घेता येईल. मात्र सध्या नाशिकमध्ये सुरू असलेल्या कामांची गती पाहता हे शक्य होईल असे वाटत नाही. एक महिन्यात यात प्रगती दिसली नाही तर सिंहस्थात येण्याबाबत विचार करावा लागेल असा इशारा यावेळी आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत संजयदास यांनी दिला.
पायऱ्यांवरुन नाराजी
महंत मुरलीदास यांनी रामकुंडावर उतरण्यासाठी केलेल्या पायऱ्यांवरुन नाराजी व्यक्त केली. आमचे महंत एकाच वेळी हजारोच्या संख्येने अमृतस्नानासाठी रामकुंडात उतरतील तेव्हा कोणत्याही प्रकारची दुखापत व्हायला नको. पायऱ्यांची रचना योग्य नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. झालेल्या कामांची पुन्हा पाहणी करून त्यात बदल करण्यात यावा अशी सूचना त्यांनी केली. त्यानंतर गिरीश महाजन, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी पायऱ्यांची पाहणी केली. त्यावर आता काय तोडगा निघतो ते पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.