Kumbh Mela latest updates Maharashtra: बडा उदासीन आखाड्याच्या पंचांनी हद्दपारीची कारवाई केलेले श्री महंत रघुमुनी महाराज यांनी संबधित पंचमंडळच स्वयंघोषित असल्याचा दावा केला आहे. आखाड्यात अशा प्रकारचा हद्दपारीचा कोणताही नियम नसल्याचं रघुमुनी यांनी म्हटलं आहे.
तमिळनाडू मधील कांचीपुरम येथे ९ जुलै २०२६ रोजी श्री पंचायत आखाडा बडा उदासी निर्वाणची बैठक झाली. या बैठकीत त्र्यंबकेश्वरचे श्री महंत रघुमुनी यांच्यासह पाच साधूंना आजीवन हद्दपार करीत त्यांचा हुक्का-पाणी बंद करण्यात आला. मात्र, कांचीपुरम येथे झालेली बैठकच बेकायदेशीर होती असे महंत रघुमुनी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
स्वयंघोषित प्रमुख महंत दुर्गादास यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून आखाड्याचे नियम रद्द केले व हुकूमशाही पद्धतीने प्रमुख महंतांची निवड केली, असा आरोप रघुमुनी महाराजांनी केला आहे. रघुमुनी महाराजांनी न्यायालयात दाखल याचिका आणि आदेशांचा हवाला देत दुर्गादास यांनी स्थापन केलेली कार्यकारिणी अवैध असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, कुंभमेळ्याच्या तोंडावर अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या दोन गटांमधील वाद चव्हाट्यावर आला असून हा वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही गट बडा उदासीन आखाडा आपल्या बाजूने असल्याचा दावा करताना दिसत आहेत.
गत महिन्यात हरिद्वार येथे झालेल्या बैठकीत महानिर्वाणी आखाड्याचे श्रीमहंत रवींद्र पुरी अध्यक्ष असल्याचे जाहीर करण्यात आले होते. १३ पैकी ८ आखाडे सोबत असल्याचे सांगत महानिर्वाणी आखाड्याचे रवींद्र पुरी यांना अध्यक्ष घोषित करण्यात आलं.
त्याला प्रत्युत्तर म्हणून त्र्यंबकेश्वर येथे बैठक घेऊन बडा उदासीन आखाड्याचे रघुमुनी महाराजांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले. यावेळी श्रीमंत रघुमुनी यांच्यावर असलेले आरोप न्यायालयाने फेटाळले असल्याचेही जाहीर करण्यात आलं. दरम्यान, कांचीपुरम बैठकीत मात्र रघुमुनी महाराजांसह पाच साधू-महंतांच्या हकालपट्टीची घोषणा करण्यात आली.
रघुमुनी यांना बडा उदासीन आखाड्याचे श्री महंत पंचपरमेश्वर यांनी आखाड्यातून आणि उदासीन संप्रदायातून काढून टाकले आहे. त्यांचा कोणताही संबंध राहिलेला नाही. त्यांना आखाड्यात ठेवण्याचे न्यायालयाचे कोणतेही आदेश नाहीत. असे बडा उदासीन आखाडा श्री महंत दुर्गादास महाराज यांचे म्हणणे आहे.
तर तथाकथित बैठकीवर सर्व मंडलातील साधूंनी बहिष्कार टाकला होता. उच्च न्यायालयाने कार्यकारिणी रद्द केली आहे. त्यांना कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. न्यायालयाच्या आदेशाचा आणि आखाड्याच्या नियमांचा अवमान करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असं श्रीमहंत रघुमुनी महाराज यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सध्या सुरु असलेल्या या आरोप-प्रत्योरांमुळे आखाडा परिषदेच्या दोन गटांत असलेला वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. या वादाचे पडसाद आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.