Nashik News : नाशिक आणि आसपासच्या परिसरात मागील काही महिन्यांपासून बिबट्याचा हल्ला, बिबट्याचे दर्शन, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू अशा अनेक घटना सातत्याने घडत आहेत. मागच्या महिन्यात चिमुकल्यांनी बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावल्याची घटना घडली आहे. मानवी जिवासोबतच बिबट्याच्या देखील जीविताला यामुळे धोका निर्माण झाला आहे. याबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रश्नाचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने त्यांनी पाऊले टाकायला सुरवात केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी उपवनसंरक्षक सिद्देश सावर्डेकर यांच्यासोबत सोमवारी (दि. १५ सप्टेंबर) बैठक घेत प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी अल्पकालीन आणि दीर्घकालीन काय उपाययोजना करणे शक्य आहे याबाबत चर्चा झाली.
याबाबत दिल्लीपर्यंत लढाई करावी लागणार आहे, त्यादृष्टीने पाऊल टाकायला आम्ही सुरवात केली आहे अशी माहिती खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिली.
नाशिक तालुक्यात वडनेर पाठोपाठ सिन्नर तालुक्यातील खंडांगळी याठिकाणी देखील बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाला. मागील आठवड्याभरात ४ ते ५ ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याच्या तर असंख्य ठिकाणी दर्शन दिल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील काही वर्षात बिबट्याचा वाढलेला अधिवास आणि मानवी वस्तीमधील संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही समस्या अत्यंत गंभीर होत चालली असून यातून मानवी आणि बिबट्याच्या देखील जीविताला प्रश्न उपस्थित झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील नाशिक, सिन्नर, इगतपुरी, निफाड आणि काही प्रमाणात दिंडोरी आणि त्रंबकेश्वर तालुक्यातील तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले, कोपरगाव तालुक्यातील असंख्य गावात अक्षरशः दहशतीचे वातावरण आहे. अंधार पडल्यानंतर बंदीस्त करून घ्यायची वेळ नागरिकांवर येत आहेत. त्यातच लोडशेडिंगमुळे रात्रीच्यावेळी शेतीला पाणी द्यायला जाणाऱ्या शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. याआधी रात्रीच्यावेळी बिबट्या हल्ला करत होता मात्र मागील काही घटनांमधून दिवसादेखील बिबट्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे. यात लहान चिमुकले बिबट्यासाठी सोप्पे शिकार ठरत आहेत. यामुळे दहशतसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
बिबट्याच्या मुक्त संचारामुळे आणि वाढत्या अधिवासामुळे निर्माण होत असलेल्या या गंभीर समस्येबाबत खासदार राजाभाऊ वाजे मैदानात उतरले असल्याचे बघायला मिळत आहे. याबाबत काय उपयोजना करता येतील याबाबत खासदार वाजे यांनी पाऊले टाकायला सुरवात केलीये. याबाबत त्यांनी स्थानिक परिस्थिती जाणून घेत त्याबाबत उपवनसंरक्षक सिद्देश सावर्डेकर यांच्यासोबत बैठक घेत चर्चा केली. यावेळी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांच्या बाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच, सोबत मिळून या समस्येवर तोडगा काढण्याबाबत एकमत झाले.
बिबट्या ही समस्या दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. यावर ठोस उपाययोजना करावी लागणार आहे. गावागावात दहशतीचे वातावरण आहे. या भीतीचे रूपांतर उद्रेकात व्हायला वेळ लागणार नाही. बिबट्याचा वाढलेला अधिवास आणि मानवी वस्तीमधील मोकळा संचार यामुळे मानवी आणि बिबट्याच्या देखील जीविताला धोका निर्माण झालाय. त्यामुळे यावर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी पाऊल टाकली जाणार आहे.
खासदार राजाभाऊ वाजे यांनी स्थानिक परिस्थिती जाणून घेतली तसेच तज्ञ मंडळींसोबत चर्चा केली. यासह उपवनसंरक्षक सावर्डेकर यांच्यासोबत बैठक घेऊन देखील प्राथमिक स्थरावर या समस्येवर काही उपाययोजना करता येतील यावर लक्ष केंद्रित केलंय. आगामी काही दिवसात याबाबत सखोल अभ्यास करून पाऊले टाकण्याचा त्यांचा मानस असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.