BJP Lok sabha Politics: शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची नुकतीच भेट घेतली. ही भेट लोकसभा निवडणुकीसाठी होती. या भेटीमागे भाजपचा एक वेगळाच राजकीय अँगल असल्याचे बोलले जाते.
शांतीगिरी महाराज यांनी नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. यापूर्वी त्यांनी औरंगाबाद मतदारसंघातून २००९ मध्ये उमेदवारी केली होती. शांतीगिरी महाराज यांचा प्रामुख्याने शेतकरी वर्गातील मतदारांशी संपर्क आहे. या आध्यात्मिक संपर्काचा उपयोग राजकीय हेतूने करून घेण्यासाठी त्यांचे काही समर्थक गेले वर्षभर नियोजन करीत होते. त्याचा परिणाम म्हणून त्यांनी नाशिक मतदारसंघातून आपला प्रचारदेखील सुरू केला आहे. त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेने राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी सरळ सरळ विभागणी आहे. त्यात मनसे अथवा वंचित आघाडी हा एक वेगळा फॅक्टर ठरू शकतो. शांतीगिरी यांचे समर्थक त्यादृष्टीने दिवस-रात्र विचार मग्न आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यात शांतीगिरी यांनी ठाकरे यांची भेट घेण्याचादेखील प्रयत्न केला होता. मात्र, ठाकरे यांनी त्याला फारसे महत्त्व दिले नाही. वेळेचे गणित न जमल्याने ही भेट झाली नाही. शांतीगिरी यांच्या समर्थकांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडेदेखील प्रयत्न करून पाहिला आहे. त्यानंतर आता त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाकडे उमेदवारी संदर्भात भेट घेतली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शांतीगिरी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्यात त्यांना शिंदे गटाची उमेदवारी अथवा पाठिंबा हवा आहे हे स्पष्ट आहे. तसे झाल्यास ते महायुतीचे उमेदवार ठरू शकतात, यामागे औरंगाबाद मतदारसंघ आणि भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा एक राजकीय अँगल पुढे येत आहे.
भाजपने औरंगाबाद मतदारसंघातून डॉक्टर कराड यांना उमेदवार म्हणून जवळपास निश्चित केले आहे. कराड यांची लढत 'एमआयएम'चे खासदार इम्तियाज जलील यांच्याशी असेल. मात्र, त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आहेत. चंद्रकांत खैरे हे अत्यंत प्रबळ उमेदवार मानले जातात. गतवर्षीच्या चौरंगी लढतीतदेखील आणि हर्षवर्धन जाधव यांनी पावणेतीन लाख मते घेऊनदेखील खैरे यांचा अवघ्या पाच हजार मतांनी पराभव झालेला आहे. हा पराभव खैरे समर्थक आणि शिवसेना ठाकरे गटाच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत गत निवडणुकीप्रमाणे विभागणी होईल, अशी स्थिती व उमेदवार नाहीत. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला जिंकण्यासाठी विविध घटकांची गरज पडणार आहे.
शांतीगिरी महाराज यांचे कार्यक्षेत्र वेरूळ अर्थात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून २००९ मध्ये शांतीगिरी यांनी उमेदवारी केली होती. त्या निवडणुकीत शांतीगिरी यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. शांतीगिरी यांना अवघी १,४८,०२६ मते मिळाली होती. काँग्रेसचे उत्तम सिंग पवार यांना २,२२,८८२ तर शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना २,५५,७८६ मते मिळविली होती. औरंगाबादच्या ग्रामीण भागात शांतीगिरी यांना आध्यात्मिक दृष्टीने मानणारा एक वर्ग आहे.
शांतीगिरी महाराज यांना शिंदे गटाची अर्थात महायुतीची उमेदवारी मिळविल्यास त्यांचे वेरुळ आणि औरंगाबादच्या ग्रामीण भागातील अनुयायी मतदार म्हणून आयतेच भाजपच्या उमेदवाराला मदत करतील, असा एक राजकीय अँगल आहे. त्यामुळे खुद्द केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड शांतीगिरी आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घडवून आणण्यासाठी पडद्यामागून प्रयत्नशील होते अशी चर्चा आहे. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ जागा जिंकायच्या आहेत. त्यांच्या या मिशनला ग्राउंड रिॲलिटी तेवढी अनुकूल दिसत नाही. अशा स्थितीत औरंगाबादसारख्या मतदारसंघात शांतीगिरी यांच्या आध्यात्मिक अनुयायांना मतदार म्हणून पाठीशी ठेवण्याचे बेरजेचे राजकारण भाजप यामध्ये करीत असावा.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.