MHADA housing scam investigation in Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik MHADA Scam : दोन तलाठ्यांनीच केला नायब तहसीलदार नितीन पाटलांचा भांडाफोड, आता महसूल विभागाचेही दणाणले धाबे

Nitin Patil Arrest: नाशिक म्हाडा घोटाळा प्रकरणात संशयित नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक करण्यात आली असून त्यांची एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. या कारवाईनंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

Ganesh Sonawane

Nashik MHADA scam talathi expose: नाशिकच्या म्हाडा फसवणूक प्रकरणात एसआयटीकडून अटकेचे सत्र सुरुच आहे. याप्रकरणी शनिवारी रात्री उशीरा पोलिसांनी मोठी कारवाई करत नाशिक तालुक्याचे अपर नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक केली.

दरम्यान संशयित नायब तहसीलदार नितीन पाटील यांच्या कारनाम्यांचा भांडाफोड हा दोन तलाठ्यांनीच केल्याची धक्कादायक माहिती कळते आहे. दोन्ही तलाठ्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार पाटील यांच्याविरोधात पुरावे गोळा करण्यात आल्याची माहिती आहे. आता पाटील यांच्या आर्थिक व्यवहारांची देखील पोलिस चौकशी करत आहे.

पाटील यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ३१ प्रकरणांमध्ये फेरफार नोंदी करण्याचे तलाठ्यांना आदेश दिले होते. त्यानुसार पाटील यांना अटक करण्यात आली असून पाटील यांचे आणखी कारनामे समोर आले आहेत. पाटील यांनी ३१ प्रकरणांमध्ये २२-२३ वर्षांपूर्वीच्या भूमी अभिलेख कार्यालयातील छायांकित प्रतीवरून 'फॉर्म १२' वर कोणतीही पडताळणी न करता कार्यवाहीचे आदेश दिले.

उपअधीक्षक भूमी अभिलेख हे पद २०१० नंतर अस्तित्वात आलेले असताना, 'तालुका भूमी अभिलेख' नावाने तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला. शासकीय शिक्क्याचा गैरवापर केला तसेच मूळ प्रत उपलब्ध नसताना पोटहिश्श्यासाठी नकलेच्या सत्यप्रतीवरून कारवाईचे आदेश दिल्याचे तपासातून समोर आले आहे.

शहरातील ४९ गृहप्रकल्पांमध्ये म्हाडा सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २० टक्के राखीव क्षेत्र ठेवण्याच्या नियम धाब्यावर बसवत, बनावट कागदपत्रांच्या आधारे म्हाडाची फसवणूक केल्याप्रकरणी एसआयटीच्या पथकाकडून तपास सुरु असून तब्बल १९४ जणांवर सरकारवाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. यासंदर्भात भूमी अभिलेख कार्यालयाने सरकारवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.

याप्रकरणात यापूर्वी सर्वात आधी बिल्डर सोनू मनवानीला अटक करण्यात आली होती, सशर्त जामीनावर मनवानी काही दिवसांपूर्वीच जेलबाहेर आले. त्यानंतर दीपक करमचंदानी यांना अटक झाली.

आता या प्रकणात तिसरी अटकेची कारवाई नायब तहसीलदार पाटील यांच्यावर करण्यात आली आहे. दरम्यान गुन्हा दाखल झालेले अनेकजण जामिनासाठी धावाधाव करत असून काहीजण कारवाईच्या भीतीने शहरातूनच गायब आहेत.

अपर नायब तहसीलदार नितीन पाटील यांना याप्रकरणात संशियत म्हणून शनिवारी (दि. २) रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपत असल्याने बुधवारी (दि.६) त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

पाटील यांनी तहसीलदारांचे अधिकार वापरून सुमारे ३१ दस्तांना परस्पर परवानग्या दिल्या आहेत. या परवानग्या देताना त्यांनी संशयित बांधकाम व्यावसायिकांकडून आर्थिक लाभ घेतल्याचा संशय असून हे लाभ कोणत्या स्वरूपात प्राप्त झाले, याचा शोध गुन्हे शाखा घेत आहे.

तसेच पाटील तपासात हवे तसे सहकार्य करत नसल्याची माहिती देखील समोर येत आहे. दरम्यान पाटील यांच्या अटकेनंतर बांधकाम व्यावसायिकांसह महसूल विभागाचेही धाबे दणाणले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT