Ganesh Gite & MLA Rahul Dhikle Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Politics : नाशिकमध्ये गोकुळ गितेंच्या माघारीने एक कलह मिटला, दुसरा वाढण्याची शक्यता

Rahul Dhikle Vs Ganesh Gite : अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी काल नाशिक विधानपरिषदेच्या रिंगणातून माघार घेतली. त्यातून एक कलह मिटला असला तरी गिते विरुद्ध ढिकले हा दुसरा कलह वाढण्याची शक्यता आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत भाजप नेते गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने महायुतीमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला होता. शिवसेना-भाजपमध्ये तणाव वाढला होता. काल गोकुळ गिते यांनी प्रचार थांबवण्याची घोषणा केल्याने हा कलह थांबला. मात्र आता गिते विरुद्ध ढिकले कलह वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय व भाजपचे स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांनी अर्ज भरला होता. मात्र, त्यानंतर नाशिकची जागा शिवसेनेला सुटल्याने माघारीच्या दिवशी गणेश गिते यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याने त्यांनी माघार घेतली. मात्र, त्यामागे भाजप मधील काही लोकप्रतिनिधी असल्याचा आरोप गिते यांनी केला होता.

आपल्यावर दबाव येऊ शकतो ही शक्यता लक्षात घेता गणेश गिते यांनी बंधू गोकुळ गिते यांना मैदानात उतरवलं होतं. मात्र, काल त्यांनाही माघार घ्यावी लागली. राजकारणामुळे कुटुंब फुटतं, हे मला ठाऊक आहे. म्हणूनच माझ्या पाठीशी उभे राहताना माझ्या भावाचा राजकीय बळी जाऊ नये, या विचाराने मी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाने त्याला थांबण्याची विनंती केली. गोकुळने घेतलेला निर्णय हा कौटुंबिक शांततेसाठी आहे, असा अत्यंत भावनिक खुलासा भाजप नेते गणेश गिते यांनी केला. तसेच गोकुळ गिते आजपासून राजकीय निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

या माघारीमागील अंतर्गत राजकारणावर प्रसारमाध्यमांशी बोलताना गणेश गिते यांनी पूर्व विधानसभेचे भाजप आमदार राहुल ढिकले यांच्यावर गंभीर आरोप केले. विधान परिषदेसाठी आपण निवडणूक लढण्यासाठी तयारी करत होतो. मात्र ही जागा शिंदेसेनेला सुटली, त्यावर आमदार ढिकले यांनी आपणच ही जागा भाजपला सुटू नये यासाठी प्रयत्न केले, असे एका नगरसेवकाशी बोलताना सांगितल्याचा आरोप गिते यांनी केला.

ते आमच्या नगरसेवकांनाही दमदाटी करत होते असाही आरोप गितेंनी केला. एका नगरसेवकाला देखील ढिकले यांनी 'तू गिते यांची फार वाहवा करतो का' असा प्रश्न केल्याचा दावा गिते यांनी केला. आता निवडणूकीत व्हीप देण्यासाठी शहराध्यक्ष कर्तव्याने काम करतील असेही ते म्हणाले. गिते यांनी आमदार अॅड. राहुल ढिकले आणि शहराध्यक्ष सुनील केदार यांचा नामोल्लेख केल्याने अंतर्गत कलह वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गिते -ढिकले वाद काय?

विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या गणेश गिते यांनी बंडखोरी केली होती. भाजपच्या अॅड. राहुल ढिकले यांच्या विरोधात गिते यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी केली होती. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात झालेल्या या निवडणुकीत ढिकले यांचा विजय झाला होता. तेव्हापासून ढिकले विरूद्ध गिते असा सुप्त संघर्ष सुरू झाला आहे. गिते यांनी त्यानंतर मंत्री महाजन यांच्या कृपेने पुन्हा भाजपत घरवापसी केली. गिते यांच्या प्रवेशाला ढिकले यांचा विरोध होता. महाजनांनी ढिकले यांची समजूत घालत त्यांच्याच उपस्थितीत गितेंचा भाजपत प्रवेश घडवून आणला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT