Nashik Politics : महापालिका निवडणुकीसाठी नाशिकमध्ये भाजपने शंभर प्लसचा नारा दिला आहे. हे उदि्ष्ट गाठण्यासाठी भाजपने पक्षात इतर पक्षातून मोठ्या प्रमाणात सुरु केलेली आयात भाजपच्याच निष्ठावान कार्यकर्त्यांच्या अंगलट येऊ लागली आहे. मनपा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या चार पदाधिकाऱ्यांची मोठी फजिती झाली आहे. उमेदवारी मागायला गेले पण ती राहिली दूर याउलट त्यांच्यावर हकालपट्टीची वेळ ओढावली. हकालपट्टी होता होता राहिली... भाजपच्या या चार पदाधिकाऱ्यांसोबत घडलेला किस्सा सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळ्या केल्याने आता दिवाळीच्यानंतर निवडणुकीचे फटाके फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक आतापासूनच फिल्डिंग लावत आहे. त्याचाच भाग म्हणून दोन माजी नगरसेवक आणि दोन पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीसाठी नाशिकचा कारभार ज्यांच्या हातात आहे, अशा मुंबईतल्या नेत्याकडे धाव घेतली. मात्र, पहिल्या दिवशी काही भेट होऊ शकली नाही, दुसऱ्या दिवशी भेटायला या म्हणून त्यांना कळवलं गेलं. मग काय त्या चौघांनी रात्र मुंबईतच घालवायची ठरवली. पण करायचं काय ? म्हणून चौघांनी मुंबईच्या नाटलाईफचा आनंद गाठण्यासाठी एक बार गाठला.
पुढे, भाजपचे हे चौघेही पदाधिकारी घोट घेत घेत काहीसे झिंगाट झाले. मग काय लगेच मनातलं ओठावर आलं. ज्या नेत्याला भेटायचे होते त्याच नेत्याच्या जीवनपटावर खमंग चर्चा करत त्यांनी टीकेचा भडीमार सुरु केला. पण ते म्हणतात ना भिंतीला पण कान असतात. चर्चा करताना शेजारी त्याच नेत्याचा कार्यकर्ता बसलेला होता. त्याने या चौघांची चर्चा रेकॉर्ड केली व रेकॉर्डिंग त्या नेत्याला पाठवलं. मग काय दुसऱ्या दिवशी थेट चौघांच्या हकालपट्टीचा आदेश मुंबईतून निघाला.
दुसऱ्या दिवशी झिंग उतरल्यानंतर चौघांचेही धाबे दणाणले. मग काय चौघा पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी नाही मिळाली तरी चालेल पण हकालपट्टी नको म्हणून आर्जव केल्याने कारवाई टळल्याची जोरदार चर्चा सध्या भाजपमध्ये सुरू आहे. उमेदवारीऐवजी या आपबितीतून सुटका करण्यासाठी चौघांनी नाशिक गाठले. यापुढे अशी चूक होणार नसल्याचा माफीनामा देऊन उमेदवारी नको, पण हकालपट्टी टाळा असे आर्जव केले. त्यामुळे वाद नको म्हणून पक्षानेही चौघांवरील कारवाई टाळली.
पण शेवटी एवढं सगळं घडलं आणि चर्चा होणार नाही असं कसं? विषय संपला परंतु चर्चा मात्र संपत नसल्याने कोणा-कोणाच्या तोंडाला कुलूप लावणार? असे म्हणत या चौघांनी सध्या पक्ष कार्यालयाकडे चकरा कमी केल्याचं दिसतंय. या चौघांवरील आपबीतीची भाजप कार्यालयात मात्र खुमासदार चर्चा सुरु आहे.