Devendra Fadanvis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela : फडणवीसांच्या सभेला गर्दी जमली नाही, आता राष्ट्रपतींच्या कार्यक्रमासाठी भाजप नगरसेवकांना 'शंभर नंबरी' टार्गेट

Droupadi Murmu Nashik Visit : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण 31 ऑक्टोबर रोजी होणार असून हा सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी भाजपने पक्षपातळीवर तयारी केली आहे.

Ganesh Sonawane

Nashik Kumbh Mela Flag Hoisting : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण भव्य स्वरूपात साजरे करण्यासाठी भाजपने पक्षपातळीवर तयारी केली आहे.

३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या ध्वजारोहण सोहळा आणि गोदाआरतीसाठी प्रभागातील शंभर नागरिकांना आणण्याचे टार्गेट नगरसेवकांना देण्यात आले आहे. २२ ऑक्टोबर रोजी भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत नगरसेवकांना हे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वत: दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेत नियोजनाची माहिती दिली.

ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रपती पहिल्यांदाच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणार आहेत. त्यांच्या हस्ते नाशिकमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून २ मिनीटांनी धर्मध्वजारोहण होणार आहे. त्या निमित्ताने नाशिक शहरात आणि त्र्यंबकेश्वर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर सायंकाळी गोदाआरतीचा विक्रम करण्यात येणार आहे. त्यासाठी साडे सहा हजार आदिवासींना निमंत्रित करण्यात येणार आहे.

त्यासोबतच कुंभगीत, कॉफीटेबलचे अनावरण, टपाल तिकीटाचे अनावरण असे भरगच्च कार्यक्रम होणार असून या सोहळ्याला सुमारे पंधरा हजार नागरिकांची उपस्थिती असावी असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

CM फडणवीसांच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यांची चर्चा

दरम्यान, नाशिकमध्ये यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘भक्ती संगम’ कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी सभागृहातील अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचे चित्र समोर आले होते. या कार्यक्रमातील उपस्थितीवरून चर्चा झाली होती. शहरात भाजपचे ३ आमदार व ७२ नगरसेवक असूनही गर्दी का जमली नाही असा सवाल उपस्थितीत झाला होता. फडणवीस बोलत आहेत आणि पुढे रिकाम्या खूर्च्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. गर्दी न जमण्यास नगरसेवकांची कुंभमेळा प्राधिकरणावर असलेली नाराजी कारणीभूत असल्याचे बोलले गेले होते.

त्यामुळे गेल्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सभेला कमी गर्दीचा अनुभव पाहाता आत्ताच्या ध्वजारोहण सोहळ्याला नगरसेवकांना शंभर नागरिक आणण्याचे टार्गेट देण्यात आल्याची देखील चर्चा आहे. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणाऱ्या या महत्त्वाच्या सोहळ्याला नागरिकांची मोठी उपस्थिती राहावी, यासाठी पक्षपातळीवर विशेष नियोजन केले जात असल्याचे दिसते.

यावेळी ध्वजारोहण आणि गोदाआरती सोहळ्यासाठी गर्दी जमवण्याची जबाबदारी नगरसेवकांवर सोपवण्यात आली आहे. प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागातील शंभर नागरिकांना उपस्थित ठेवायचे असून, गोदाकाठी येण्यासाठी या नागरिकांना प्रवेशिकाही दिल्या जाणार आहेत. मात्र, परिसरात सुरू असलेले खोदकाम आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर असलेला कडेकोट बंदोबस्त पाहता, इतके नागरिक जमवणे प्रत्येक नगरसेवकासाठी आव्हान असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT