Nashik politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर हे आता भाजपमध्ये जात आहेत. भाजप आमदार सीमा हिरे यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला होता. मात्र हा विरोध डावलून बडगुजर यांचा आज भाजपात प्रवेश होतो आहे. मुंबई येथे आज बडगुजर यांचा पक्षप्रवेश होणार असून ते भाजपवासी होतील. मात्र सीमा हिरे यांनी बडगुजर यांना आपला विरोध कायम असल्याचे सांगितले आहे.
बडगुजर यांचा पक्षप्रवेश होण्यापूर्वी सीमा हिरे यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले, बडगुजर यांच्या प्रवेशाविषयी कोणतीही कल्पना नव्हती. परंतु त्यांच्या प्रवेशाला विरोध कायम आहे. 'देशद्रोही आणि बंडखोर लोकांबरोबर काम करणं अवघड आहे.' त्यांनी आपली भूमिका यापूर्वीच मांडली असून ती कायम आहे असे स्पष्ट केलं. शिवाय काल सोशल मीडियावर विरोध कायम आहे असे सांगणारी पोस्टही आपण केल्याचे सीमा हिरे म्हणाल्या. बडगुजर यांच्या प्रवेशामुळे भाजपमध्ये दोन गट पडले आहेत का, या प्रश्नावर त्यांनी 'मला काहीच कल्पना नाही' असे उत्तर दिले.
आमदार सीमा हिरे व सुधाकर बडगुजर यांचा मतदारसंघ एकच आहे. विधानसभेला आमदार सीमा हिरे व सुधाकर बडगुजर एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढले. बडगुजर यांनी निवडणुकीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्रास दिला. बडगुजर यांच्या मुलाने एकावर गोळीबार केला. त्यांच्यावर १७ गुन्हे दाखल आहेत. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता सोबत डान्स करताना त्यांचा व्हिडीओ आहे. ते गुन्हे लपवण्यासाठी भाजपमध्ये येत असतील असे आरोप सीमा हिरे यांनी यापूर्वी बडगुजर यांच्यावर केले होते.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मकाऊला कुटूंबासोबत गेले असताना त्याचे मकाऊ मधील कॅसिनो खेळतानाचे फोटो हे बडगुजर यांनीच व्हायरल केल्याचा आरोपही सीमा हिरे यांनी केला. मात्र बावनकुळे यांनी सीमा हिरे यांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करत बडगुजर यांची पाठराखण केली होती. त्यांनी बडगुजर यांच्यावरील गुन्हे सिद्ध झालेले नसल्याने त्यांना आरोपी म्हणता येणार नाही असं म्हटलं. सीमा हिरे यांच्या आरोपांना एकप्रकारे बावनकुळे यांनी केराची टोपलीच दाखवली.
मात्र सीमा हिरे यांनी त्यानंतरही बडगुजर प्रवेशाचा विषय अत्यंत प्रतिष्ठेचा केला होता. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही त्यांनी भेट घेतली होती. मात्र भाजपच्या नेतृत्वाने स्थानिक आमदारांचा विरोध डावलून बडगुजर यांचा पक्षप्रवेश निश्चित केला. बडगुजर हे आज मंगळवार सकाळी शेकडो पदाधिकाऱ्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले. मध्यरात्री दोन वाजता त्यांच्या पक्षप्रवेशाविषयीच्या सूचना मिळाल्याची माहिती भाजप अध्यक्ष सुनिल केदार यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.