Nashik President Visit : राष्ट्रपतींच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड व गोदाघाट परिसरातील भिकारी आणि निराधार नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने ५० ते ६० जणांना शेल्टर होममध्ये हलवले. त्याचबरोबर परिसरात फिरणाऱ्या १५ ते २० मोकाट श्वानांना पकडून आडगाव येथील प्राणी केंद्रात ठेवण्यात आले आहे.
रामकुंड परिसरात नेहमीच मोठ्या संख्येने भिकारी आणि निराधार नागरिक वास्तव्यास असतात. येथे धार्मिक विधींसाठी येणारे भाविक त्यांना दान देतात, तसेच अन्नदानही करतात. परिसरातील अनेक मंदिरांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. त्यामुळे दोन्ही वेळच्या जेवणाची सोय होत असल्याने अनेक निराधार आणि भीक मागणारे नागरिक या भागात मुक्काम करतात. अंदाजे १०० ते १५० जणांचा या परिसरात नियमित वावर असतो.
राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने या नागरिकांचा परिसरातील वावर अडथळा ठरू नये, यासाठी महापालिकेने विशेष मोहीम राबवली. गेल्या आठवडाभरात ५० ते ६० भिकारी आणि निराधार व्यक्तींना ताब्यात घेऊन शहरातील चार शेल्टर होममध्ये हलवण्यात आले. तेथे त्यांच्या जेवणासह आरोग्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शेल्टर होममध्ये आता गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातील काही जणांना गाडगे महाराज आश्रमशाळेत ठेवण्यात आले. संपूर्ण रामकुंड परिसर भिकारी आणि निराधार व्यक्तींपासून रिकामा करण्यात आला असून एकही भिकारी राहणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे.
रामकुंड आणि गोदाघाट परिसरात मोकाट श्वानांची संख्या मोठी आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने येथील १५ ते २० श्वानांना पकडले. त्यांना आडगाव येथील महापालिकेच्या श्वान निर्बीजीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. राष्ट्रपतींचा दौरा पूर्ण झाल्यानंतर या श्वानांना पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी सोडण्यात येणार आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये माकडांची धरपकड
त्र्यंबकेश्वरमध्ये देखील माकडांचा मोठा उपद्रव असतो. राष्ट्रपती त्र्यंबकेश्वर येथे जाणार असून त्यांच्या हस्ते कुशावर्त व त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा होणार आहे. या सोहळ्यात माकडांचा उपद्रव नको म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर परिसरातील माकडांना पिंजऱ्यात कैद करण्यात आलं आहे. सोहळ्यानंतर त्यांना पुन्हा सोडून दिले जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.