Satyajeet Tambe reply to Ashwini Vaishnaw Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Pune Railway : ‘वडापाव’वरून थेट ‘माँ के हाथ का खाना’; तांबेंची रेल्वेमंत्र्यांना भावनिक साद

Satyajeet Tambe emotional appeal to railway minister: अश्विनी वैष्णव यांच्या पोस्टला सत्यजित तांबेंचा रिप्लाय; ‘पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वेत वडा-पाव मिळण्याची सोय करा’, म्हणत संगमनेरमार्गे रेल्वेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर.

Pradeep Pendhare

Nashik Pune High Speed Railway : नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेरमार्गे व्हावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला आता भावनिक मुद्द्याची जोड मिळताना दिसत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जागतिक वडापाव दिनानिमित्त सोशल मीडियावर वडापावबाबत पोस्ट केली. त्यावर काँग्रेसचे आमदार सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया देत पुणे-नाशिक रेल्वेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला आहे.

अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर, ‘लसूण चटणी की तळलेली मिरची? वडा-पावसोबत तुमचा आवडता साथीदार कोणता?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर सत्यजित तांबे यांनी त्याच पोस्टवर प्रतिक्रिया देत रेल्वे मार्गाचा मुद्दा मांडला.

‘लसूण चटणी की तळलेली मिरची, सर? दोन्हीपैकी काहीही चालेल. फक्त पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वेत वडा-पाव मिळण्याची सोय करा. आम्ही या एका गोष्टीची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहोत,’ अशा आशयाची प्रतिक्रिया आमदार तांबे (Satyajeet Tambe) यांनी दिली.

आमदार तांबे यांनी पुढे या रेल्वे मार्गाचा संगमनेरकरांच्या (Sangamner) सर्वसामान्यांच्या भावनांशी असलेला संबंध अधोरेखित केला. ‘काहींसाठी वडा-पाव म्हणजे आनंदाची मेजवानी आहे; पण घरापासून दूर राहणाऱ्या अनेक तरुणांसाठी तो अनेकदा जगण्याचा आधार असतो,’ असे त्यांनी म्हटले.

त्याचवेळी पुणे-नाशिक थेट रेल्वे सुरू झाल्यास घरापासून दूर राहणाऱ्या तरुणांना अधिक वेळा घरी पोहोचता येईल आणि ‘माँ के हाथ का खाना’ खाण्याची संधी मिळेल, अशी भावनिक बाजूही तांबे यांनी मांडली.

संगमनेरमार्गे रेल्वेसाठी आंदोलन

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेरमार्गे व्हावी, यासाठी संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा सुरू आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्यासह स्थानिक नागरिकांकडून या मागणीसाठी भूमिका मांडली जात आहे.

आंदोलनप्रकरणी गुन्हे दाखल

या मागणीसाठी नाशिक, संगमनेर, जुन्नर आणि शिरूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार सत्यजित तांबे नाशिकमधील आंदोलनात सहभागी झाले होते.

संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आणि जयश्री थोरात यांनी आंदोलनात सहभाग घेतला, तर खासदार अमोल कोल्हे शिरूरमधील आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनांप्रकरणी गुन्हे दाखल झाल्याचेही समोर आले आहे.

सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा

विशेष म्हणजे, या मार्गासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही लोकप्रतिनिधींकडूनही पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे संगमनेरमार्गे रेल्वे नेण्याच्या मागणीला स्थानिक पातळीवर व्यापक राजकीय पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या पातळीवर

नाशिक-पुणे रेल्वेचा मार्ग आणि त्याचा अंतिम आराखडा हा केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.

मंत्री वैष्णव यांना आमदार तांबेंची भावनिक साद

याच पार्श्वभूमीवर वैष्णव यांच्या वडापाववरील पोस्टला उत्तर देताना तांबे यांनी रेल्वेचा मुद्दा पुन्हा मांडला. त्यामुळे वडापावच्या पोस्टपासून ‘माँ के हाथ का खाना’पर्यंत पोहोचलेली ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

संगमनेरमार्गे नाशिक-पुणे रेल्वेचा प्रश्न केवळ वाहतुकीचा नसून शिक्षण, रोजगार आणि घरापासून दूर राहणाऱ्या तरुणांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला असल्याचा भावनिक संदेश तांबे यांच्या प्रतिक्रियेतून देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT