Nashik News: जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा आजपासून अधिकृत प्रारंभ होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने रामकुंड परिसर सजवण्यात आला असून, तब्बल साडेसहा हजार आदिवासी बांधव राष्ट्रपतींसमवेत गोदा आरती करणार आहेत.
कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे रामकुंडावरील गोदावरीचे मंदिर या उत्सवाच्या निमित्ताने बारा वर्षातून एकदाच खुले होते. त्यासाठी विविध विकास कामांमुळे रामकुंडावर अव्यवस्था होती. कार्यक्रमाच्या निमित्ताने रोषणाईचा झगमगाट आणि विविध शोभेच्या फलकांनी अव्यवस्था झाकून हा परिसर चकाचक करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काल रात्री शहरात आगमन झाले. मुख्यमंत्र्यांनी रात्री अकराला रामकुंड तसेच गोदावरी परिसराची पाहणी केली. आजच्या कुंभमेळा ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला.
राष्ट्रपतींच्या स्वागताला राज्यपाल तसेच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांसह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. भारतात चार ठिकाणी कुंभमेळा होतो. मात्र नाशिकच्या कुंभमेळ्याचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे नाशिक येथे रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त अशा दोन ठिकाणी होणारा हा एकमेव सिंहस्थ कुंभमेळा आहे.
राष्ट्रपतींच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते कुशावर्त ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी साधुंच्या उपस्थित ध्वजाची विधीवत पूजा केली. यानंतर रामकुंडावर गोदा आरती तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार, एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री महाजन, तसेच छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी, महंत ज्ञानदास, जगद्गुरु नरेंद्राचार्य, निर्वाणी आखाड्याचे श्रीमहऺत मुरलीधर, निर्मोही आखाड्याचे श्रीमंत राजेंद्र दास आणि सर्व तेरा आखाड्यांचे प्रमुख महंत व पुरोहित संघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.