Nida Khan Case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Imtiaz Jaleel: नाशिक TCS प्रकरणात इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल; व्हॉइस सॅम्पलही घेतले! निदा खान प्रकरणात मोठी घडामोड

Nida Khan Case: नाशिक TCS धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती. SIT तपासात नवे वळण.

Mangesh Mahale

Nashik News: देशभरात गाजलेल्या TCS धर्मांतर आणि महिला लैंगिक शोषण प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांचे नावही समोर आल्याची माहिती आहे. मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. यापूर्वी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावरही याच प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता राजकीय वर्तुळापर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे.

इम्तियाज जलील यांचा जबाब नोंदवला; व्हॉइस सॅम्पलही घेतले

नाशिक पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. या पथकामार्फत विविध बाजूंनी तपास सुरू आहे. तपासादरम्यान एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या मोबाईल फोनमध्ये काही संभाषणांच्या रेकॉर्डिंग आढळल्याची माहिती समोर आली होती. या रेकॉर्डिंगच्या अनुषंगाने इम्तियाज जलील यांचीही चौकशी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी इम्तियाज जलील यांचा जबाब नोंदवला असून त्यांचे व्हॉइस सॅम्पलही घेतल्याची माहिती आहे. निदा खान हिला आश्रय देण्याच्या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा मुद्दा तपास यंत्रणेकडून न्यायालयासमोर मांडण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणात उपलब्ध पुराव्यांच्या आधारे त्यांचे नाव आरोपींमध्ये समाविष्ट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांना पुढील चौकशीसाठी तसेच न्यायालयीन प्रक्रियेसाठी हजर राहावे लागू शकते.

निदाच्या भूमिकेबाबत न्यायालयाने काय म्हटले?

या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिच्या भूमिकेबाबत यापूर्वी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले होते. प्राथमिक चौकशीत निदा खानने इतर सहआरोपींच्या मदतीने पीडित महिलेवर मानसिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते.

पीडित महिलेचा विश्वास संपादन करून तिच्या धार्मिक विचारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. 'हिंदू धर्म ठीक नाही', असे सांगून पीडितेची विचारसरणी बदलण्याचा तसेच धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप नोंदवण्यात आला आहे. लैंगिक छळ आणि धर्मांतराच्या आरोपांशी संबंधित या प्रकरणात निदा खानची भूमिका महत्त्वाची असल्याचेही न्यायालयाने प्राथमिक निरीक्षणात नमूद केले होते.

SIT च्या तपासाकडे लक्ष

नाशिकमधील TCS कंपनीशी संबंधित या प्रकरणात महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळासह धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आता निदा खानला आश्रय दिल्याच्या प्रकरणात इम्तियाज जलील यांचे नाव समोर आल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. SIT च्या पुढील तपासात आणखी कोणती माहिती समोर येते आणि संबंधित व्यक्तींकडून काय भूमिका मांडली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT